
कराड ः कराडात वर्चस्व वादातून एकास बेदम मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दिवसभरात शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून दोन्ही गटातील युवकांची दिवसभर धरपकड सुरू होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सुमारे वीस जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अबरार कोकणे (वय 22, रा. मुजावर कॉलनी, कराड) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, समाज माध्यमावरील इन्स्टाग्रामवर किंग ऑफ कराड अशी पोस्ट टाकली होती. त्याच्या विरोधात पोस्टही टाकली होती. त्यावरून सोशल मिडीयावर वाद सुरू होता. त्यावरून दोन गटात वाद झाला. त्याचा राग मनात धरून सुमारे आठ ते दहा युवकांनी मुजावर कॉलनी येथे जाऊन अबरार कोकणे यास गाडीत घालून नेऊन विद्यानगर परिसरात त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अबरार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीनंतर काही युवकांच्या जमावाने पोलिस स्टेशनसमोर एकत्र येत गोंधळ निर्माण केला. जास्त जमाव जमल्यानंतर पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर व कर्मचाऱ्यांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांकडून मारहाण झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून यामध्ये आणखी किती जणांचा समावेश हे तपासण्याचे काम सुरू आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून रात्री उशिरापर्यंत सुमारे वीस जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
जमावाकडून बारवर दडगफेक
कराडातील वर्चस्व वादातून झालेल्या मारहाणीत काही ठराविक जणांची नावे समोर येत आहेत. त्यावरून काही युवकांनी कराडातील एका बारवर दगडफेक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणीही पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत दगडफेकतील संशयितांना ताब्यात घेतले आहे.