
कराड : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांच्या परिसरात वनराई फुलावी आणि त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर व्हावा, यासाठी कराड तालुक्यातील वसंतगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वृक्षांचे जतन करण्याचा निर्धारही करण्यात आला.
मलकापुरातील विठ्ठलदेव हौसींग सोसायटीमधील सामाजिक कार्यकर्त्या अॅस्टोलॉजिस्ट वृषाली दिनेश चव्हाण-पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच वन विभागाच्या सहकार्यातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. वसंतगडावर फळझाडांसह गर्द सावली देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच या रोपांचे कायमस्वरुपी जतन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी दिनेश चव्हाण, सिंधू पाटील, विशाखा जाधव, ज्योती चव्हाण, डॉ. पुनम हाके, अगस्त्य हाके, सिद्धेश जाधव, सचिन जगताप, शर्मिष्ठा चव्हाण, शिवांश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासातील सुवर्णक्षण होता. त्या सोहळ्याचे औचित्य साधत ठिकठीकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष आज गडकिल्ले देत आहेत. त्यांच्या या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी तसेच त्याचे चिरंतन स्मरण राहण्यासाठी किल्ल्यांच्या परिसरात प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे,’ असे आवाहन अॅस्ट्रोलॉजिस्ट वृषाली चव्हाण-पाटील यांनी केले आहे.