ताज्या बातम्याराजकियराज्य

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसानी परवानगी नाकारली

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते.

मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

चार दिवसांपूर्वी अंतरवलीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

आंतरवाली सराटी गावातील उपसरपंचांसह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले होते. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला होता. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close