
कराड ः येथील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी कराड येथे चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघड करून 52 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक चारचाकी वाहन असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रमेश महादेव कुंभार (रा. कशेळी, ता. भिवंडी, जि. ठाणे) व निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील पंधरा दिवसापूर्वी कराडातील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरट्यांनी घराची खिडकी उचकटून खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून 38 लाख रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. सदर गुन्ह्ययाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबांबत माहिती प्राप्त करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखा कराडचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी, साक्षीदार व आजूबाजूच्या लोकांकडे तपास केला. तसेच घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडीचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला. सदर वाहनांची पडताळणी केली असता सदरचे वाहन पोलीस रेकार्डवरील रमेश कुंभार याचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस ठाणे येथे जाऊन रमेशच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात वेषांतर करून चार दिवस पाळत ठेवून होते. तसेच पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना रमेश कुंभार हा सातारा बसस्टँड परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकांना रमेश कुंभार याला ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश कुंभार व त्याचे सोबत असणारा निलेश गाढवे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी फलटण भागातही चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चोरीस गेलेले 52 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली गाडी असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पतंग पाटील, धनाजी देवकर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अमोल माने, शिवाजी भिसे, जयवंत खांडके, अमित माने, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रविण कांबळे, स्वप्नील कुंभार, अजय जाधव, अमित झेंडे, ओमकार यादव, मोहन पवार, अरूण पाटील, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील दौंड, मयूर देशमुख, वैभव सावंत, शिवाजी गुरव, दलजीत जगदाळे, विजय निकम, अमित पवार, शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, महेश शिंदे, महेश पवार यांनी केली.
192 गुन्हे उघड करून 3 कोटी 86 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नोव्हेंबर 2022 पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरी असे एकूण 192 गुन्हे उघड करून त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यापैकी तीन कोटी 86 लाख 40 हजार रूपये किमतीचे साडेपाच किलो सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला.