
कराड : रेकॉर्डवरील सराईत आरोपीला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघड केला. कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
इब्राहिम अब्बासअली शेख (वय २५, रा. सूर्यवंशीमळा, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी, घरफोडीसारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत उपअधीक्षक अमोल ठाकूर व निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे हे गुन्ह्यांचा तपास करीत होते. त्यावेळी शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टेंभू गावच्या हद्दीतील धानाई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर एका गुराळानजीक रेकॉर्डवरील आरोपी इब्राहिम शेख हा संशयास्पदरित्या फिरताना गुन्हे शाखेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. पोलीस हवालदार नितीन येळवे तपास करीत आहेत.