
कराड ः कराड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची कार्यवाही निश्चितीपणे करुन मात्र कऱ्हाडकरांनी साथ द्यावी. शहरातील सिग्नलच्या टायमिंगमुळे अपघाताचा धोका विचारात घेवुन ते टायमिंग बंद केले जाईल. बस स्थानकावरील रिक्षा वाहतुक आणि प्रीतिसंगमावरील वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल. अनाधिकृत रिक्षा थांबे पालिकेकडून यादी आल्यावर ते बंद करण्यात येतील अशी ग्वाही सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, पालिका अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नागरिक, नगरपालिका प्रशासन आणि आरटीओ कार्यालय अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पोलीस भवनमध्ये ही बैठक पार पडली.
वाहतूक शाखेचे प्रभारी राहुल वरोटे यांनी बैठकीस प्रारंभ केला. या बैठकीस नगरपालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुविधा पाटील, मोटर वाहन निरीक्षक अमोल कदम, नगरपालिका अभियंता ए. आर. पवार यांच्यासह माजी नगरसेवक सौरभ पाटील, दादा शिंगण, अशोकराव पाटील, दक्ष कराडकर चे प्रमोद पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सौरभ पाटील यांनी शहरातील विविध मार्गावरील स्पीडब्रेकर कमी करावेत. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वाढल्यास मुख्य रस्त्यावरील ताण कमी होऊन त्याचा नागरिकांना व वाहनचालकांनाही फायदा होईल, त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. शहरातील सिग्नल चौकात अतिक्रमण दूर करत या ठिकाणी वाहने लावण्यास बंदी करण्यात यावी. मुख्य बाजारपेठेत पार्किंगला शिस्त लावत 24 तास बाजारपेठेत चार चाकी वाहने येणे आवश्यक त्यासाठी मुख्य बाजारपेठेलगत वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग असावे अशी मागणी सौरभ पाटील यांनी केली.
अशोकराव पाटील यांनी शहरातील रिक्षा थांब्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे असे सांगत अवैध रिक्षा थांबे त्वरित हटवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बस बसस्थानक परिसरातील कर्मवीर पुतळा परिसरात दिवसभर अवैध प्रवासी वाहने, रिक्षा थांबतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते हे लक्षात घेत या ठिकाणी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच दत्त चौक ते विजय दिवस चौक फूटपाथ रिकामे व्हावेत, मंडईत गाड्या नेतात. मोबाईल व दागिने चोऱ्या, सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी ही पाटील यांनी केली.
दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील, सतीश भोंगाळे व माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांनी टिळक हायस्कूल, प्रीतीसंगम बाग परिसरातील वाहतूक कोंडी व भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. सातारा जिल्हा रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष अमृत बाबर यांनी महामार्गावर ठेकेदार कंपनीकडून अपघातानंतर जखमींकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत महामार्ग प्राधिकरणाशी याबाबत प्रशासनाने चर्चा करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली.
मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी व पार्किंग याबाबत व्यापारी असोसिएशनचे दिनेश पोरवाल, घनश्याम पेंढारकर, सौरभ पाटील, प्रमोद पाटील यांनी आपआपली मते मांडत उपाययोजना करण्याची मागणी केली.
महामार्गावरील खड्डे व त्यामुळे होणारे अपघात याबाबत मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. महामार्ग सहापदरीकरण करताना ठेकेदार कंपनीकडून वाहन चालकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा केला जात आहे. प्रत्येक वेळी आंदोलन केल्याशिवाय उपाययोजना होणार नाहीत का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित करत महामार्ग प्राधिकरणाचे ठेकेदार कंपनीला योग्य त्या सूचना द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा या बैठकीत दादा शिंगण यांनी दिला.
यावेळी अधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरातील रिक्षांना शिस्त लावली जाईल, कर्मवीर पुतळा परिसरात वाहतुकीला शिस्त लावुन भाजी मंडईतील गैरसोय दुर केली जाईल. सीसीटव्हीचा अॅक्सेस वाहतुक शाखेला मिळल्यावर वाहतुक कोंडी टाळता येईल, त्यासाठी शहरात अधिक लक्ष दिले जाईल.पालिकेकडुन शहरातील खड्डे भरण्यात येतील. प्रीतिसंगमावरील वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार असुन कृष्णाबाई घाटावरील लहान मुलांच्या गाड्या बंद करण्यात येतील. शाळांच्या परिसरातील वाहतुक कोंडीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातील, मलकापुर ते कोल्हापुर नाका दरम्यानची गैरसोय दुर करण्यात येईल. कराड शहरातील अंतर्गत रस्त्यावर पार्किंगची सोय करता येईल का याची तपासणी केल जाईल. विठ्ठल चौकातील वाहतुकीला शिस्त लावुन स्कुल बससेचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.