
पाटण : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते शुक्रवारी शालेय वहयांचे वाटप करण्यात आले. तर मतदारसंघातील 548 जिल्हा परिषद शाळांमधील 12 हजार 586 विद्यार्थ्यांना त्या-त्या विभागा व गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते शालेय साहित्यासह 50 हजार वहयांचे वाटप करण्यात आले.
पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ असला, तरी या तालुक्याचा शैक्षणिक दर्जा नेहमीच उंचावलेला पाहवयास मिळतो. तालुक्याचे सुपुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याचे शिक्षणमंत्री असताना संपूर्ण राज्यात शैक्षणिक ईबीसी सारखी सवलत जाहीर करून सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची दारे खुली करून दिली. परिणामी, त्यांनी संपूर्ण देशात महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात प्रगतशील राज्य म्हणून नावारूपास आणले. लोकनेत्यांचे नातू, राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे. त्यानुसार ना. देसाई यांच्या भेटीसाठी येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हार, शाल, नारळ, पुष्पगुच्छ आदी साहित्य न आणता शालेय वहया व वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहन वेळोवेळा केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ना. देसाई यांच्या संकल्पनेला यश आहे.
सदरच्या वह्या व शालेय साहित्य पाटण मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.