ताज्या बातम्याराजकियराज्य

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार : जयंत पाटील

मुंबई : राज्यात आज 11 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये विधानसभेचे आमदार मतदान करणार आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार हे निश्चित असले तरी क्रॉस व्होटिंगमुळे यामध्ये मोठा उलठफेर होऊ शकतो. अशात सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांनी सुरक्षित ठिकाणी ठेवत घोडेबाजार टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

असे असले तरी काँग्रेसचे चार आमदार आहेत, जे महाविकास आघाडीला मतदान करणार नाहीत अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

दरम्यान या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात आहेत. यात काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांनी खळबळजन दावा केला आहे. ते म्हणाले की, “या निवडणुकीत काँग्रेसचे असे तीन ते चार आमदार आहेत ते क्रॉस व्होटिंग करणार आहेत. कारण ते फक्त कागदोपत्रीच काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्यात मोजत नाही.”

जयंत पाटलांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली असून, यामध्ये कोणाशी दगाफटका होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत भाजपची महायुतीही मजबूत दिसत आहे. महायुतीचा 11 पैकी 9 जागांवर विजय जवळपास निश्चित मानला जात आहे, परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या वातावरणात शिवसेनेचे काही आमदार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे काही आमदार महाविकास आघाडीला मतदान करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महायुतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.

शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवत संभाव्य क्रॉस व्होटिंग टाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे कोणत्याही आमदारावर बाहेरून दबाव टाकता येणार नाही. याचबरोबर घोडेबाजारही टाळता येणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close