
कराड : दगड, मुरूम, व लाल माती या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी महसूल खात्याची परवानगी घ्यावी लागते. याबाबत काही नियमावली करण्यात आली आहे. यासाठी ज्या कार्यालयातून परवानगी घ्यायची आहे, त्या कार्यालयात प्रथम अर्ज करावा लागतो. त्यानंतर तो अर्ज चौकशीसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला जातो व त्याचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठ कार्यालयातून उत्खननासाठी व वाहतुकीसाठी अटी व शर्ती घालून परवानगी आदेश दिला जातो.
या अनुषंगाने उंब्रज मंडल मधील मिळालेल्या माहितीनुसार 52 विटभट्टी व्यवसायकांनी तहसील कार्यालयात वीट भट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीसाठी उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्या अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयातून चौकशीसाठी मंडल अधिकारी उंब्रज त्यांच्याकडे पाठवण्यात आले होते. चौकशीसाठी आलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मंडल अधिकारी यांनी प्रथम ज्या जमिनीतून माती उत्खनन करणार आहेत त्या ठिकाणचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. तसेच ज्या ठिकाणी वीट भट्टी आहे ती जागा बिनशेती केली आहे की नाही याचाही पंचनामा करणे अपेक्षित आहे. तसेच जबाब व इतर कागदपत्राची पूर्तता करून तसा अहवाल तहसील कार्यालयात सादर करणे अपेक्षित आहे.
या अनुषंगाने मंडल अधिकारी उंब्रज यांनी 52 वीट भट्टी साठी लागणाऱ्या लाल माती ज्या क्षेत्रातून उत्खनन करणार आहेत, त्या ठिकाणचा पंचनामा करणे गरजेचे होते. परंतु, 51 क्षेत्रामधून उत्खनन करणार होते त्या ठिकाणचा मंडल अधिकारी उंब्रज यांनी पंचनामे केलेले नाहीत. तसेच 1 वीट भट्टी धारकाने पावसामुळे लाल माती उचलली नाही. त्यामुळे त्याला मुदत वाढ देण्याची असल्याने त्या क्षेत्राचा पंचनामा केलेला आहे.
तसेच 52 वीट भट्टी व्यवसायकांची व्यवसाय करणारी जागा बिनशेती केलेली आहे की नाही याचे पंचनामे केलेले आहेत. परंतु हे पंचनामे करताना मंडल अधिकारी उंब्रज यांच्याकडे टीव्ही सिरीयल मधील शक्तिमान पेक्षाही मोठी पावर असल्याचे दिसून येत आहे. शक्तिमानला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी थोडा वेळ तरी लागत होता. पण यांच्याकडे असलेल्या पावर मुळे यांना वेळेची कोणतीच अडचण वाटली नाही असे दिसत आहे.
उंब्रज मंडल अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी आलेल्या अर्जांच्या अनुषंगाने दि.1, 2 ,व 3 तारखेला वीटभट्टी धारकांच्या वीटभट्टीच्या जागेची बिनशेती आदेश घेतलेले आहेत की नाहीत यासाठी उंब्रज, भोसलेवाडी, शिवडे, हनुमानवाडी, कोर्टी या ठिकाणी जावून पंचनामे केलेले आहेत. यामध्ये अशी माहिती मिळवून आली आहे की 1 तारखेला विटभट्ट्यांचे केलेल्या पंचनाम्यात सकाळी 11 वा. कोर्टी मध्ये एकाच वेळी दोन वेग वेगळ्या गटाचे पंचनामे केलेले आहेत. तसेच सकाळी 12 वा. कोर्टी मध्ये व भोसलेवाडी मध्ये एकाच वेळी दोन गावामधील गटांचे पंचनामे केलेले आहेत. तसेच 2 तारखेला सकाळी 10 वा. भोसलेवाडी मध्ये दोन वेगवेगळ्या गटाचे एकाच वेळी पंचनामे केलेले आहेत. तसेच सकाळी 11 वा. भोसलेवाडी मध्ये एकाच वेळी तीन वेगवेगळ्या गटांचे पंचनामे केलेले आहेत. व याच वेळेत कोर्टी मधील एका गटाचा पंचनामा केलेला आहे. तर एकाच वेळी मंडल अधिकारी यांनी दोन गावांमधील गटांचे पंचनामे केलेले आहेत. तसेच 3 तारखेला सकाळी 11 वा. शिवडे गावामध्ये दोन वेगवेगळ्या गटांचा एकाच वेळी पंचनामा केलेला आहे. तसेच भोसलेवाडी व कोर्टी येथील गटांचे याच वेळेत पंचनामे केलेले आहेत. म्हणजे उंब्रज मंडल अधिकारी यांनी एकाच वेळी तीन गावातील गटांचे पंचनामे केलेले आहेत. एकाच वेळी एका गावात दोन वेगवेगळ्या गटाचे पंचनामे करीत असतील व एकाच वेळी दोन व तीन गावांमधील गटांचे पंचनामे करीत असतील तर त्यांच्याकडे शक्तिमान पेक्षाही जादा पावर असल्याचे दिसत आहे. कारण शक्तिमान ला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी थोडा वेळ तरी लागत होता, पण हे तर तीन ठिकाणच्या गावातील गटांचे पंचनामे करण्यासाठी एकाच वेळी पोचलेले आहेत.
तसेच त्यांच्याकडील पावर संपली की काय म्हणून एक व तीन तारखेला केलेल्या काही पंचनाम्यावरती वेळ टाकलेली नाही. तसेच इतर पंचनाम्यात तारीख व वेळ टाकलेली नाही. तसेच एका पंचनाम्यात सकाळी 3 वा. पंचनामा केला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महसूल खात्यास पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे. शनिवार व रविवार या दिवशी सुट्टी देण्यात आलेली आहे. परंतु उंब्रज मंडल अधिकारी यांनी 2 तारखेला शनिवार व 3 तारखेला रविवार व 10 तारखेला रविवार असताना सुट्टीच्या दिवशी पंचनामे केलेले आहेत यामागचे गौड बंगाल काय?
वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत सखोल चौकशी करून मंडल अधिकारी उंब्रज यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
क्रमशः
पुढील भागात उंब्रज मंडल अधिकारी यांची कधी सिंघम तर कधी जॉनी लिव्हर सारखी दुटप्पी भूमिका…