
कराड ः कराड तहसील कार्यालयातील सेतू सेवा केंद्रामध्ये दाखल्यांसाठी पावतीपेक्षा जादा पैसे घेणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जयकुमार बाजीराव सुर्यवंशी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन कराडचे तहसीलदार विजय पवार यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कराड तहसील कार्यालयातील सेतू सेवा केंद्रात प्रचंड जनतेची दाखल्यामागे लूट सुरू आहे. सरकारी दरापेक्षा अधिक पैसे घेत आहेत. प्रत्येक दिवशी 500 ते 600 दाखले येतात. परंतु सरकारी नियमाप्रमाणे एक दाखल 33 रूपये 60 पैसे व जात व नॉनक्रिमीलरच्या दाखल्यासाठी 57.20 रूपये खर्च येतो. तरी प्रत्येक दाखल्यामागे 150 रूपयेची पावती आकारण्यात येत आहे. म्हणजे एका दाखल्याला 100 ते 120 रूपयेचा भुर्दंड सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी व पालकांना बसत आहे. दिवसभरात सर्व दाखल्याचे सरासरी 33 हजार रूपये जादा मिळत आहेत. महिन्याची सरासरी काढली तर सात लाख 26 हजार रूपये हे सर्वसामान्य जनतेचा व शेतकऱ्यांचा पैसा कंपनी चालकाच्या खिशात जात आहेत. याबाबतीत प्र्रांताधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. तसेच सातारा तहसीलदार यांनी वैभव स्वामी याला 10 लाख 53 हजार 580 रूपये इतका दंड केला होता. अखेर सेतू केंद्रामध्ये जितके पैसे गोळा केलेत ते सेतू कंपनीकडून वसूल करावे अन्यथा तसे न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जयकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये दाखल्यासाठी विद्यार्थी किंवा पालकांकडून जादा पैशाची मागणी करीत असेल तर त्यांनी त्वरीत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी केले आहे.