
कराड ः विद्यानगर परिसरात धारदार शस्त्राचा धाक दाखवत दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या फाळकुट दादास गुरूवारी रात्री कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली.
कुंदन जालिंदर कराडकर रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड असे अटक केलेल्या फाळकुट दादाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विद्यानगर परिसरात गुरूवारी रात्री कुंदन कराडकर हा हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवत तेथील छोट्या मोठ्या व्यावसायिकास धमकावून खंडणी मागत होता. याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यासह तात्काळ घटनास्थळी पोहचून कुंदन कराडकर यास शस्त्रासह ताब्यात घेतले. याप्रकरणी कुंदनवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, रघुवीर देसाई, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.
दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
कराड शहर व परिसरात जर कोणी दहशत माजवून खंडणी उकाळण्याचा प्रकार करत असेल तर नागरिक, व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता कराड शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधवा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी केले आहे.