
कराड : विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या युवकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून गुरूवारी रात्री वारूंजी ता. कराड गावचे हद्दीतील अन्नपूर्णा हॉटेलच्या समोरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह जप्त केले.
ओंकार उर्फ के. के. श्रीकांत माने (वय 21, रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड) असे पिस्टल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वारूंजी ता. कराड गावच्या हद्दीत अन्नपूर्णा हॉटेलच्या समोरील बाजूस एकजण पिस्टल घेऊन उभा असल्याची माहिती कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता तेथे ओंकार उर्फ के. के. श्रीकांत माने हा संशयास्पद दिसून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह मिळून आले. पोलिसांनी पिस्टल व मॅक्झिन जप्त करून ओंकार माने यास ताब्यात घेतला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.