पुढच्या दहा दिवसांत १० तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामाना करावा लागला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र राज्यात जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीचं वारं जोरदार वाहू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘काल महायुतीची बैठक झाली, जागा वाटपाबाबत काही चर्चा झाली. पुढच्या दहा दिवसांत १० तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल. पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जागा वाटप जाहीर करतील. काही जागा वाटपाबाबत आमचं एकमत झालं आहे. आम्ही कुठलीही आकडेवारी मांडली नाही, जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय झाला आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की जागा किती कोणाला मिळाव्या हे महत्त्वाचं नाही. राज्यात आमच्या योजना पुढे नेण्यासाठी महायुतीचं डबल इंजिनचं सरकार हवं आहे. आमचा जागेसाठी आग्रह नाही तर जिंकण्यासाठी प्राथमिकता आहे. महायुतीला 13 मित्र पक्ष आहेत, जागा वाटपात त्यांचाही विचार होणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि मी या बैठकीला उपस्थित होतो.