
कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये दाखल्यांच्या नावाखाली नागरिकांकडून जादा रक्कम उकळून त्यांची फसवणूक केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे तहसील कार्यालयात सुरू असून यासंबंधी अनेक नागरिकांकडून तक्रारी होत असून याबाबत वरिष्ठ मूक गिळून गप्प आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, प्रतिज्ञा पत्रासाठी(कोणत्याही ॲपीडेव्हिड) साठी 50 रुपये घेतले जातात. परंतु पावती 34 रुपयाची दिली जाते. तसेच पैसे दिल्यानंतर जो कोणी पावती मागील त्यालाच 34 रुपयाची पावती दिली जाते, अन्यथा पावती दिली जात नाही. यापूर्वीही तहसील कार्यालयातील सेतू मध्ये अशीच ज्यादा रक्कम उकळून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. जादाची रक्कम घेतलेल्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावरती गेल्याने या कार्यालयावरती निवासी नायब तहसीलदार यांना याबाबत लक्ष ठेवण्याबाबतच्या तोंडी सूचना दिल्याची चर्चा आहे.
एक तक्रारदार ही ज्यादा रकमेची पावती घेऊन निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे चौकशी कामे गेला असता ते रजेवर असल्यामुळे महसूल नायब तहसीलदार यांच्याकडे सर्व पुरावे कागदपत्रे दाखवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सेतू कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलावून घेऊन याबाबत विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी 33.60 व सेतू शुल्क 20 रुपये असे 53.60 रुपये घेण्याबाबत आम्हाला सेतू ठेकेदार यांनी सांगितले असल्याचे सांगितले. तसेच प्रतिज्ञापत्रासाठी 53.60 रुपये घेण्याबाबत सांगितले आहे. परंतु प्रतिज्ञा पत्रासाठी शासनाला 33.60 रुपये व सेतू शुल्क 20 रुपये घ्यायचे आहेत. असे शासनाच्या परिपत्रकामध्ये नमूद असेल तर ते 53.60 रुपये घेऊन तशी पावती का देत नाहीत, 50 रुपये घेऊन 34 रुपयाची पावती लोकांना का दिली जाते याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.
तरी सेतू कार्यालयातून कोणतेही प्रतिज्ञापत्र अथवा दाखला घेतल्यास भरलेल्या रकमेची पावती सर्वांनी घ्यावी व जादा रक्कम मागणी केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावरती घालावे तसेच या आर्थिक फसवणुकीबाबत काही समाजसेवकांच्याकडून वरिष्ठांच्याकडे लवकरच तक्रार दाखल होणार असल्याची चर्चा सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात चालू आहे.
क्रमशः