
कराड : कराड तालुक्यात नवीन अधिकारी नवीन कायदा याचा पायडांच पडलेला आहे. येणाऱ्या नवीन अधिकाऱ्याने आपल्या मर्जीनुसार कारभार करायचा आणि त्याचा त्रास जनतेला द्यायचा हे नवीन चित्र सध्या कराड तहसील कार्यालयात पाहावयास मिळत आहे. कराड तालुक्यातील 22 कोतवालांना त्यांच्या सज्यातील कामकाज सोडून तहसील कार्यालयातील कामकाज करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा भार त्या गावातील तलाठ्यांवर पडत असल्याने अनेक ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. या नवीन अधिकाऱ्याने नवा पायंडा पाडल्याने याच्या संतप्त प्रतिक्रिया कराड तालुक्यातून उमटत आहेत.
कराड तालुका हा सातारा जिल्ह्यामधील दोन मतदारसंघाचा तालुका आहे. यामुळे तालुक्यामध्ये काम हे त्याचपटीने आहे. परंतु सध्या झालेल्या तलाठ्यांच्या बदल्या यामध्ये जेवढे तलाठी कराड मधून बाहेरच्या तालुक्यामध्ये बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्या पटीमध्ये तालुक्यामध्ये दुसरे तलाठी आलेले नाहीत. तसेच कित्येक अण्णासाहेबांच्या कडे दोन-तीन गावांचा कारभार बघावा लागत आहे. हे काम करत असताना शासनाने काढलेल्या अनेक योजनांच्या कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यावेळेस अण्णा साहेबांना कसरतच करावी लागत आहे. एका व्यक्तीने दोन-तीन गावांचा कारभार सांभाळायचा म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. परंतु, त्यांच्या हाताखाली असणारे कोतवालांमुळे दोन-तीन गावच्या कारभाराचे काम अण्णासाहेब व्यवस्थित पार पाडत होते.
परंतु कराड तालुक्यामध्ये नवीन अधिकाऱ्यांची एन्ट्री होताच कराड तालुक्यातील साधारण 22 कोतवालांची तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आदेश काढून नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत एवढ्या कोतवालांच्या कधीही नेमणुका तहसील कार्यालयामध्ये करण्यात आलेल्या नव्हत्या. परंतु, नवीन अधिकारी हजर झाल्यानंतर असे कोणते नवीन संकट आले की त्याच्यामुळे गावाचा कारभार पहायचा सोडून कोतवालांना तहसील कार्यालयातील विभागांचा कारभार पहावा लागत आहे.
मुळात कोतवाल यांची नेमणूक असलेल्या मूळ सजा मध्ये काम करण्याबाबत वरिष्ठांनी निर्देश दिलेले असताना वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कोतवालांना तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये नेमणूक करण्याची आवश्यकता होती का? या बाबत तहसील कार्यालयामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे.
क्रमशः पुढील भागात कोणाच्या फायद्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जातेय