मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण ? : देवेंद्र फडणवीस

पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती दिनापासून (17 सप्टेंबर) पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत. त्यांना कोण उपोषणाला बसवत आहे हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण, असाच सवाल उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे 29 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार होते. मात्र त्याआधीच अनंत चतुर्दशी आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचा दिवस असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामापासून आमरण उपोषण सुरु करमार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण आणि सगे सोयरेचे कायद्यात रुपांतर करण्याची त्यांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रखडले असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना वारंवार उपोषणाला कोण बसवत आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, काल या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा रोडमॅप मुख्यमंत्र्यांनी तयार केला आहे. सरकार सकारात्मक आहे. जरांगेंना उपोषणाला कोण बसवत आहे त्याचे उत्तर तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात असताना 36 तासांत फायरिंगच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर पुणे दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी आम्ही कोणालाही सोडणार नाही. तत्काळ त्यांचा शोध घेऊन त्यांना जेलमध्ये टाकतो. पोलिस त्यांचे काम करत आहेत. असे म्हटले.
गुंडासोबत नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एवढ्या मोठ्या गर्दीत कोण जवळ उभा राहून फोटो घेतो. हार टाकून जातो काही माहित नसते. पण गुंडाची पार्श्वभूमी माहित असून जाणीवपूर्वक त्याची भेट घेतली जात असेल तर ते गंभीर आहे, असं फडणवीस म्हणाले.
आगामी विधानसभेच्या दृष्टीने महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची निवड आणि जागा वाटपाचे अधिकार देवेंद्र फडणवीसांना दिले आहेत. पहिली यादी केव्हा येणार या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चालले आहे. लवकरच आमची चर्चा पूर्ण होईल.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा सदस्य माधुरी कुलकर्णी, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ होते. पुण्यामधील 21 विधानसभा जागांपैकी अनेक ठिकाणी भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. यावर फडणवीसांनी भाष्य करणे टाळले. जागा वाटपाची चर्चा व्यवस्थित सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.