
कराड ः कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डीवायएसपी पथक व तळबीड पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ या कंपनीमधून तब्बल 1,270 ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याने किंमत सुमारे 6 कोटी 35 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यातील तीनजणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर कंपनीचा मालक एन.डी.पी.एस. गुन्ह्यामध्ये तेलंगाणा पोलीस यांच्या कोठडीत आहे. तर एकजण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी मलकापूर कराड), रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवार्डे ता. पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव) हा तेलंगाणा पोलिस यांच्या कोठडीत आहे. तर विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड जिल्हा पुणे) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हात अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबविणेच्या सूचना पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांना दिल्या होत्या. तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की तासवडे एमआयडीसीमधील ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ कंपनीमध्ये अंमली पदार्थाची साठवणूक व निर्मिती होत आहे. डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांचे अधिपत्याखाली डीवायएसपी कार्यालय कराड व तळबीड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कंपनीत छापा टाकला असता कंपनीमध्ये 6 कोटी 35 लाख रूपये किमतीचे 1,270 कि.ग्रॅ. वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ फॉरेन्सिक सपोर्ट टिमचे मदतीने ताब्यात घेऊन जप्त केले. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार अभय मोरे यांनी तळबीड पोलिसात दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक काळे, सहाय्यक फौजदार शशिकांत खराडे, पोलीस हवालदार शहाजी पाटील, योगेश भोसले, आनंदा रजपूत, गोरखनाथ साळुंखे, निलेश विभुते, अभय मोरे, सुशांत कुंभार, महेश शिंदे, प्रविण गायकवाड, गणेश राठोड, ऋषिकेश वेल्हाळ, महिला पोलीस विनया वाघमारे, रत्ना कुंभार, शितल मोहिते तसेच कराड डीवायएसपी कार्यालयातील सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, दिनेश घाडगे, पोलीस हवालदार असिफ जमादार, संताजी जाधव, प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, सुरज चिंचकर, अमोल फल्ले, राजाराम बाबर तसेच फॉरेन्सिक विभागाचे पोलीस हवालदार प्रशांत ताटे, दिनानाथ जाधव, शंभुराज साळुंखे, आदित्य लोंढे, सायबर पोलीस ठाण्याचे रणजित कुंभार, प्रशांत मोरे, ओंकार डुबल, सुशांत घाडगे यांनी केली.