पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात ठोकणार तंबू, 5 ते 14 नोव्हेंबर दरम्यान सभांचा धडाका

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार आहे. पंरतु काही ठिकाणी इतर पक्ष मजबूत असल्याने तिरंगी लढती होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी लोकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात प्रचाराला वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रात सलग आठ दिवस सभांचा धाडाका लावणार आहेत. 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान मोदी महाराष्ट्रात तंबू ठोकणार आहेत. महायुतीतीतल जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे भापज, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीने प्रचारात आधीच आघाडी घेतली आहे. लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेन्जर ठरू शकते असे मानले जात आहे. असे असले तरी माहायुतीकडून प्रचारात कोणतीही कसर सोडली जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
महायुतीसाठी थेट पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आठ दिवस प्रचार सभा घेणार आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या या सभा होणार आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये या सभा पार पडणार आहेत. पंतप्रधानांचा 14 नोव्हेंबरनंतर परदेश दौराही नियोजित असल्यानं सभांना कमी कालावधी मिळणार आहे. सभांची प्रत्यक्ष ठिकाणं अद्याप भाजपकडून निश्चित झालेली नाहीत. परंतु मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर यासह इतर ठिकाणी या सभा होतील असे मानले जात आहे.
यंदाची निवडणूक राज्याची दिशा ठरवणारी निवडणूक मानली जात आहे. कारण दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडून चार पक्ष तायार झाले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत पहिल्यांदाच 6 प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन मुख्य पक्ष आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीन प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी असे अनके छोटे मोठे पक्ष विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असे मानले जात आहे.