
मुंबई : ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांवरही टीका केली. शिवसेना ही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंची संपत्ती नाही अशा शब्दांत त्यांनी टीकेची झोड उठवली. तसंत कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे, अजित पवारांचं नाही असंही ते म्हणाले.
मी ज्या सभा ठेवल्या आहेत त्या जवळपास निवडून येणाऱ्या ठिकाणी ठेवल्या आहेत असं राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं. काल दिवाळी संपली, आजपासून आमचे फटके फुटाया लागले. अजून वातावरण, आमचा आवाज, विचार सगळंच तापायचं आहे. कुठून तरी सुरुवात कारवी लागते. मी आज फक्त दर्शन घेण्यासाठी नाही तर तुमच्याकडून एक हमी घेण्यासाठी आलो आहे. जिथे मनसेचे उमेदावर असतील त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
“हा फक्त विजयासाठी घाट घातलेला नाही. गेली 5 वर्षं आपण महाराष्ट्र पाहत आहोत. महाराष्ट्रात काय सुरु आहे? 2019 ला ज्यांना मतदान केलं मग ती युती असेल किंवा आघाडी; पहिल्यांदा युतीत कोण होतं, आघाडीत कोण होतं? आता युतीत कोण, आघाडीत कोण? कशाचा कशाला थांगपत्ता राहिलेला नाही. तुम्ही दिलेलं मत कुठे आहे हे सांगून दाखवा. गेल्या 5 वर्षात ज्या गोष्टी घडल्या याची तुम्ही मनात उजळणी केली पाहिजे,” असं आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केलं.
पुढे ते म्हणाले, “आमचा राजू विधानसभेत एकटा होता. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर माझी निशाणी घेऊन दुसरीकडे जाऊन बसला असता. पण असल्याच गोष्टी माझ्या सहकाऱ्यांच्या डोक्याला शिवत नाहीत”.
“शिवसेना, भाजपा यांच्यासमोर काँग्रेस आण राष्ट्रवादीचं आव्हान होतं. 2019 ला निवडणुका झाल्या, मग निकाल लागले आणि सकाळचा शफथविधी झाला. 15 मिनिटात ते लग्न तुटलं, कारण काकाने डोळे वटारले. मग लगेच घरी आले काका मला माफ करा,” असा टोला राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला.
“मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरे जाऊन बसले. मला अमित शाह यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची हमी दिली होती असं त्यांचं म्हणणं होतं. हे चार भिंतीत झालं होतं. पण उद्धव ठाकरेंसमोर व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदींनी फडणवीस पुढील मुख्यमंत्री असतील असं सांगितलं होतं. अमित शाह यांनीही फडणवीसांचं नाव घेतलं तेव्हा आक्षेप का नाही घेतला? मला शब्द दिला आहे, मग त्यांचं एकट्याचं नाव का घेत आहात असं विचारलं का नाही. निकाल लागेर्यंत कोणी काही बोलेना, 2019 चा निकाल लागल्यावर आपल्याशिवाय सरकार होणार नाही लक्षात येताच बोलायला सुरुवात केली की मुख्यमंत्रीपद द्या, अन्यथा जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.
यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागत म्हटलं की, “वेगळ्या विचारांची युती, आघाडी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह गेल्यानंतर लाजिरवाणी गोष्ट म्हणजे सगळ्या फोटोंवरुन बाळासाहेबांच्या नावामागील हिंदुह्रयदसम्राट उपाधी काढून टाकली. कोणी त्यांचा हिंदुह्रयदसम्राट उल्लेख करण्यास तयार होईना. शिवसेनेच्या होर्डिंगवर फोटो, पण हिंदुह्रयदसम्राट नाही. काही तर उर्दू पाहिले आहेत. ज्यात जनाब असं लिहिलेलं असायचं. स्वार्थासाठी. खुर्चीसाठी इतके खालपर्यंत गेलात तुम्ही. मध्यंतरी विधानसभेत गेलो होतो. सर्व आमदार तिथे बसले होते. मी त्यांना बाळासाहेबांचं एक तैलचित्र विधानभवन आणि परिषदेच्या गॅलरीत लावा असं सागितलं. जेणेकरुन त्यातील आमदारांना आपण पायरी कोणामुळे चढलो हे कळेल”.
“पक्षाशी , विचारांशी प्रताडणा सुरु आहे. विचार नावाची काही गोष्टच उरलेली नाही. हे इकडे बघत असताना 40 आमदार निघून गेले. ते कुठेकरी निसर्ग पाहायला गेले होते. मुख्यमंत्र्यांना आमदार गेल्याचा पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणा असते. पण खालून 40 गेले आणि समजलं नाही. हे 40 जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे त्यावेळी की काँग्रेस, राष्ट्रवादीसह बसणं जमत नाही म्हणाले. अजित पावारांशी मांडी लावून बसताना श्वास घेता येईना असं सांगितलं. मग एकनाथ शिंदे भाजपासह गेले. अचानक कळलं मांडीवर येऊन अजित पवार बसले, आता काही करताही येईना. कोणतं राजकारण सुरु आहे? हे महाराष्ट्राच भवितव्य आहे का?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
“महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहे, शेतकरी आत्हमत्या करत आहेत आणि यांची मजा सुरु आहे. हे असे वागतात कारण तुम्ही चिडत नाही. शांत थंड लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता. वारंवार यांना मतदान करता म्हणून पर्वाच नाही. त्यांनी गृहित धरलं आहे. महाराष्ट्रातील जनता काय उखाडणार? निवडणुकीत पैसे फेकून मारु, परत रांगेत उभे राहून आम्हाला मतदान करतील, मग कसे ही वागू असा विचार ते करतात. तुम्ही हा समज मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्र, हे लोक वठणीवर येणार नाहीत. कोणी कोणासोबतही जत आहे. लाजही वाटत नाही, महाराष्ट्र असा कधी नव्हता. अशा प्रकारे गद्दारी केलेले मी पाहिले आहेत. मान खाली घालून जायचे. त्यांना लोकांची भिती वाटायची. पण आता काहीच वाटत नाही. आता देवच महाराष्ट्राला वाचवेल,” अशी हतबलता राज ठाकरेंनी व्यक्त केली.
“या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाचे आदय शरद पवार आहेत. 78 ला काँग्रेस, 92 ला शिवसेना, 2005 ला राणेंना फोडलं. आता सगळं प्रकऱण पुढे गेलं आहे. आता पक्ष, चिन्ह, नाव ताब्यात घ्यायचं. असं मी कधी पाहिलं नव्हतं. अजित पवार, एकनाथ शिंदेंनी पक्ष, नाव, चिन्ह घेतलं. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची आहे. त्याला कशाला हात घालताय. तुमच्या स्वार्थासाठी आमदार फोडाफोडीच राजकारण करायचंय ते करा. माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे, अजित पवारांचं नाही. महाराष्ट्रात वैचारिक घसरण इतकी झाली आहे.माणसं पळवली जात आहेत. ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं, त्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेश, बिहार करायंच आहे का?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.