
कराड : पान टपरी चालकावर कोयत्याने वार करुन दोघांनी त्याच्याकडील साडेसात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. शहरातील बसस्थानकानजीक घडलेल्या या घटनेप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गणेश संजय वायदंडे (रा. बुधवार पेठ, कराड) याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. श्रीधर काशिनाथ थोरवडे व अभिजीत संजय पाटोळे (दोघेही रा. बुधवार पेठ, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बुधवार पेठेत राहणाऱ्या गणेश वायदंडे याची बसस्थानकानजीक पान टपरी आहे. ११ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गणेश हा पानटपरीत असताना अभिजीत पाटोळे व श्रीधर थोरवडे हे दोघेजण त्याठिकाणी आले. मी कºहाडचा भाई आहे. तुला पानटपरी चालवायची असेल तर मला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्या दोघांनी गणेशला दमदाटी केली. तसेच त्याची कॉलर धरुन त्याला पानटपरीतून बाहेर ओढले. गणेशने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी त्याला मारहाण केली. तसेच अभिजीत पाटोळे याने त्याच्या कमरेला असलेला कोयता काढून गणेशच्या गळ्यावर वार केला. गणेशने तो वार चुकवला. त्यावेळी कोयत्याच्या मुठीने त्याच्या तोंडावर मारहाण केली. त्यामुळे गणेश रक्तबंबाळ झाला. गणेशला मारहाण केल्यानंतर त्या दोघांनी त्याच्याकडील साडेसात हजार रुपये काढून घेतले. तसेच ते दोघे तेथून निघून गेले.
हा प्रकार निदर्शनास येताच परिसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी गणेशला उपचारार्थ रूग्णालयात हलवले. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.