मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी : मनोज जरांगे

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेचे नाव सातत्याने पुढे रेटण्यात येत होते.
त्यातच एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांपासून दूर असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात असताना.
अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर आमच्यात कुठलीच नाराजी नसल्याचे स्पष्ट करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. भाजपाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने ते मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
कालच एकनाथ शिंदे यांनी राजीनामा राज्यपालांकडे सादर केला होता. त्यानंतर मात्र राज्यभरातून शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी लावून धारली होती. त्यामुळे आपसूकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी २०१९ ची पुनरावृत्ती होते की काय अशा वल्गना देखील सुरु झाल्या असताना, बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेताना, महायुतीचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे जाहीर केले.
एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला हा त्यांचा राजकीय विषय आहे, त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही, आम्ही आमच्याच कामात आहोत, येत्या रविवारी आम्ही तुळजापूर दर्शनासाठी जात आहोत.
मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे, कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘यावेळी मी आणि माझा समाज मैदानात नव्हतो, माझ्या समाजाने जे करायचे ते केले आहे, माझ्या समाजाशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही. मराठा समाज ताकतीने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये. आजकालचे सरकार भावनाशून्य आहे, त्यांना भावनेची किंमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण बाबतीत काम केले आहे, पण आम्हाला पण लढावे लागले होते. असं देखील जरांगे म्हणाले.
शिंदे म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढलो असून आमच्यात कुठलीही नाराजी नाही. महायुती मजबूत असून जनतेने जो जनादेश दिला तो लक्षात घेऊन आता आणखी खूप काम करायचंय, नापी है थोडी जमीन… अभी पुरा आसमान बाकी है.. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली असल्याचे सांगितले.
शिंदे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातल्यानेच महायुतीला यश मिळाल्याचे सांगितले. या विजयात सर्वांचेच पाठबळ मिळाले त्यामुळेच आम्ही चांगले काम करू शकलो. या अडीच वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सातत्याने पाठबळ दिल्याचे सांगताना आम्ही घेतलेले निर्णय हे क्रान्तिकारक असल्याचे देखील ते म्हणाले.