ताज्या बातम्याराजकियराज्य

वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले

मुंबई : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्घृणपणे करण्यात आली. ही घटना अत्यंत दु्र्दैवी आहे. याप्रकरणात वाल्मिक कराड किंवा कोणी असू दे, एकही जण सुटणार नाही. अशाप्रकारच्या निर्घृण हत्येला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे महायुती सरकार कोंडीत सापडले आहे. याप्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. बीडमधील सर्वपक्षीय आमदार वगळता महायुती सरकारमधील मंत्री आणि नेते संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी फार उघडपणे बोलताना दिसत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच याप्रकरणात ठाम भूमिका घेत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींना फाशी व्हावी, असे म्हटले आहे. ते बुधवारी मुंबईतील केईएम रुग्णालयातील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीआयडीने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे बीड न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे श्रेय आपलेच असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आम्ही टीम वर्क म्हणून काम केले. यामध्ये श्रेयवादाचा कुठलाही प्रश्न येत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन सध्या तिढा निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरुन महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून आल्यानंतर हा तिढा सुटेल. आम्ही सगळे प्रश्न सोडवले आहेत, हा प्रश्नदेखील सुटेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात आणखी एक इमारती उभी करण्याची गरज आहे. याठिकाणी आयुष्मान टॉवर उभारला जाणार आहे. यामुळे हजारो रुग्णांना लाभ होणार आहे. या रुग्णालयात नातेवाईकांना राहण्यासाठी जागा द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यांना मोफत औषधे देण्यासही सांगितले आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल, अशी सेवा देण्यात येईल. केईएम संस्थेला काहीही कमी पडणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close