
कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू मध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. तेथील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा अंकुश राहिला नसल्याने मनाला वाटेल त्या पद्धतीने गोरगरीब जनतेकडून पैसा वसूल करण्याचे काम जोमाने सुरू आहे. या सेतू मधील अनेक गोष्टी चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पावतीचा घोळ याबाबत अनेक वेळा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज सुद्धा उठवला आहे. मात्र, सेतू चालवणाऱ्या ठेकेदाराना, कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याने त्यांना कुणाची भीती राहिली नसल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे सेतू कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब शेतकरी, विद्यार्थी यांच्याकडून ज्यादा रकमेची लूट करून ठेकेदाराचा खिसा भरण्याचे काम सुरू आहे. या वर कमाईला वरिष्ठांनी लवकर आळा घालावा अशी मागणी सेतू कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये लोकांची फसवणूक करून ज्यादा रक्कम उकळी जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयातील सेतू केंद्राने प्रतिज्ञापत्रासाठी व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नियमानुसार सेतू केंद्राने किती रक्कम घेतली पाहिजे याबाबत लेखी अर्ज करून विचारणा केली होती. या केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्रासाठी व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 33.60 ( 33 रुपये 60 पैसे) अशी रक्कम घेऊन ऑनलाईन पद्धतीची पावती दिली जाते असे लेखी उत्तर दिलेले आहे.
तसेच सेतू ठेकेदार व सचिव जिल्हा समिती तथा उपजिल्हाधिकारी महसूल यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये सेतू ठेकेदार यांनी सेतू शुल्क म्हणून 16 रुपये 40 पैसे अथवा 20 रुपये घेण्याबाबतचा कुठेही उल्लेख केल्याचे दिसून येत नाही. अशी वस्तुस्थिती असताना तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामधून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी 33 रुपये 60 पैसे न घेता 50 रुपये घेतले जातात व त्या रकमेची शासकीय पद्धतीची ऑनलाईन पावती न देता सेतू ठेकेदार यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची पावती दिली जाते.
अशी वस्तुस्थिती असताना ठेकेदार यांनी मनमानी पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक करून ज्यादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी हे लक्ष घालून सेतू ठेकेदार याच्या वरती योग्य ती कारवाई करून तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रामध्ये होत असलेला गैरव्यवहार थांबवून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.