
कराड : दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने त्याच्या घरातून बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्याच्यावर तडीपारचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
साहील आलम मुजावर (रा.121 पालकरवाडा, मंगळवार पेठ कराड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पालकर वाडा येथील साहिल मुजावर याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला 11 जानेवारी 2024 पासून सातारा व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. मात्र मुजावर हा छुप्या स्वरुपात मंगळवार पेठेत वावरत असल्याची गोपनीय माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के.एन. पाटील यांना मिळाली. त्याबाबत पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील यांना माहिती दिली असता उप निरीक्षक प पाटील व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक देवकुळे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव यांनी बुधवारी मध्यरात्री पालकर वाडा येथे जाऊन साहिल मुजावर यास ताब्यात घेतले. त्याच्यावर हद्दपार आदेशाचे उलंघन केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.