
कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे साडेतीन हजार स्पर्धकांच्या सहभागाने रविवारी पहाटे रस्ता सुरक्षा मॅरेथॉन अभूतपूर्व उत्साहात पार पडली. कराड आरटीओ आणि रणजीतनाना पाटील मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रिया संजय गौंडाळ आणि सिद्धनाथ सत्यवान जगताप यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावला.
लिबर्टी मैदानालगत पहाटेपासून झुम्बा व्यायामाने स्पर्धकांचा उत्साह वाढवला होता. सकाळी सात वाजता आरटीओ चैतन्य कणसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीतनाना पाटील, उद्योजक सचिन पाटील, वाहतूक शाखेचे प्रमुख संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते कबुतरे आकाशात सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. रस्ता सुरक्षेचा संदेश देत हजारो स्पर्धकांनी धावण्यास सुरूवात केली. यात लहान मुले, तरुण, तरुणी, धावपटू, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा सहभाग होता.
लिबर्टी मैदान, विजय दिवस चौक, दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कृष्णा नाका, विजय दिवस चौक ते लिबर्टी मैदान अशी सुमारे पाच किलोमीटरची धाव स्पर्धकांनी पूर्ण केली. धावण मार्गावर विविध चौकात लावलेल्या डीजेंनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. ठिकठिकाणी पाणी वाटप, गोळ्या वाटप करण्यात आले. मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात आला.
स्पर्धेत महिला गटात रिया संजय गौंडाळ हिने प्रथम, तेजस्विनी चंद्रकांत सावंत हिने द्वितीय, पायल रामचंद्र कोळी हिने तृतीय, यामिनी महेश सूर्यवंशी हिने चौथा, श्रद्धा प्रशांत इंगळे हिने पाचवा तर नाझिया राजू पालकर हिने सहावा क्रमांक मिळवला.
पुरूष गटात सिद्धनाथ सत्यवान जगताप याने प्रथम, सुरज भास्कर शिरतोडे याने द्वितीय, प्रथमेश सचिन गुरव याने तृतीय, गणेश धोंडीराम भोसले याने चौथा, साहिल लालासाब जैनापुरे याने पाचवा, अवधूत आनंदा शिवनीकर याने सहावा क्रमांक मिळवला.
विजेत्या स्पर्धकांना आमदार मनोज घोरपडे, आरटीओ चैतन्य कणसे, रणजीतनाना पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार मनोज घोरपडे यांनी स्पर्धा आयोजनाचे कौतुक करत या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती होईल, असे सांगितले. तर रणजीतनाना पाटील मित्र परिवाराचे कौतुक केले. आरटीओ चैतन्य कणसे यांनीही रस्ता सुरक्षा महत्त्वाची असून याबाबतचा संदेश लोकांपर्यंत जाण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी स्पर्धा संयोजनात सक्रिय सहभाग घेणारे मुरली वत्स, अतुल पाटील, सचिन पाटील, माधव काळे, महेंद्र भोसले यांच्यासह शिवराय ट्रेकिंग ग्रुप, वसंतगड संवर्धन ग्रुप, दक्ष कराडकर, पोलीस मित्र परिवार यांचा सत्कार करण्यात आला.
दरवर्षी भव्य प्रमाणात मॅरेथॉनचे आयोजन करणार
रणजीतनाना पाटील यांनी स्पर्धेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता दरवर्षी भव्य प्रमाणात मॅरेथॉन आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केली. रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती होऊन आरटीओ विभागाचे काम थोडे कमी झाले तर या स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू सफल होईल, असे ते म्हणाले.
महिला, युवतींचा लक्षणीय प्रतिसाद
रस्ता सुरक्षा मॅरेथॉनची नोंदणी पूर्णपणे नि:शूल्क होती. त्यामुळे दोन हजार नोंदणी पूर्ण होऊन हा आकडा साडे तीन हजारावर पोहोचला होता. स्पर्धकांमध्ये महिला, तरुणी व विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती. शिवाय कराड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.