
कराड ः कोल्हापूर नाका येथील हॉटेल सरकार परमीट रूम ॲण्ड बिअर बारची तोडफोड केल्या प्रकरणी कराड शहर पोलिसात सुमारे पंधरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्र्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले असून राहिलेल्या आठजणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याप्रकरणी प्रितम राजाराम शिंदे (वय 35, रा. विरवडे, ता. कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
आलिम सय्यद, अजहर मुल्ला, हुजेब बेपारी, आमिर कोकणे, समीर कोकणे, तरबेज मुल्ला, उस्मान मुल्ला अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडात दोन गटात राडा झाल्यानंतर काही जणांच्या टोळक्याने मारहाण झाल्याचा राग मनात धरत कोल्हापूर नाका येथील पूजा चेंबर्समध्ये असलेले हॉटेल सरकार परमीट रूम ॲण्ड बिअर बार येथे जाऊन सुमारे पंधरा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठ्याने आराडाओरडा करून तू कसे दुकान चालवतो, तुझे दुकानच बंदच करतो असे म्हणत शिवीगाळ करत बारवर दगडफेक केली. त्यामध्ये हॉटेल सरकार परमीट रूम ॲण्ड बिअर बार दुकानाचा पुढील एल.ए.डी. बोर्ड, काऊंटरची ॲलबस्टर शीट, शटरचे साईडचे पॅनेलची तोडफोड करून सुमारे 25 हजाराचे नुकसान केल्याप्रकरणी सुमारे पंधरा जणाविरोधात कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून बाकीच्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मगदूम करीत आहेत.