दिल्लीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप मुसंडी मारत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, आम आदमी पक्षाला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसची पाटी कोरीच राहण्याचा अंदाज आहे.
दिल्लीतील या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल करताना काँग्रेसचेही कान टोचले आहेत.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद दिल्ली विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. दिल्लीच्या निवडणुकीतही भाजपने महाराष्ट्र पॅटर्न राबवले असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी म्हटले की, मागील 5 वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात सगळी ताकद दिली. सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात झाला. दिल्लीत झाला आणि आता बिहारमध्येही हाच फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी म्हटले की, काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर ही परिस्थिती आली नसती. दोन्ही पक्ष एकत्र असते तर सुरुवातीच्या कलापासून भाजपचा पराभव झाला असता संजय राऊत यांनी सांगितले.