एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच अधिक चांगलं होईल : बच्चू कडू

मुंबई : माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पुन्हा शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यामुळे कधीकाळी महायुतीचे मित्र असलेले बच्चू कडू फडवणीस सरकारच्या कामकाजावर नाराज असल्याचं दिसत आहे.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री बच्चू कडू यांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजकीय संबंधांमुळे मी एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो नाही. तर आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा अतिशय दयाळू आणि मनमिळाऊ नेतृत्व या राज्याला कायम राहिले पाहिजे. त्यांच दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि श्रेय आहे, असे कौतुक करत शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी कामना त्यांनी व्यक्त केली. जर असं झाले तर महाराष्ट्राच अधिक चांगलं होईल असे देखील कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी राज्यातील जुगाराच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य केले. महाराष्ट्रात जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंची संख्या वाढत आहे. नागपूरमध्ये देखील दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाने जुगाराच्या व्यसनामुळे आत्महत्या केली. मोठमोठे सेलिब्रिटी आणि खेळाडू अशा जाहिराती का करतात? असा सवाल उपस्थित करत त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने त्वरित एक समिती स्थापन करावी आणि संबंधित खेळाडू आणि सेलिब्रिटींवर कारवाई करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे टाकण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांना पुढे केले जात आहे. तसेच टाळूवरच लोणी खाणारी जी औलाद आहे ती इथे दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतरही सरकार डावपेच खेळण्याचं काम करत असून, हे महाराष्ट्राला घातक ठरू शकतं. एका बाजूला दुर्लक्ष करून दुसऱ्या बाजूला भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केलाय.
राजकारणी लोकांच्या सार्वत्रिक भावना या सामान्यांप्रती प्रामाणिक राहिल्या नाहीये. रोज सामान्य माणसांची लूट होत आहे. परंतु या सरकारला कदर नाहीये. सहा महीने झाले दिव्यांगांना पगार आणि मजुरांना मजूरी मिळत नाहीये. ज्याच हातावर पोट भरत असेल तो रोज कसा जगत असेल या सरकारची जाणीव संपली आहे.अशी टीका करत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.