भाजपा प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपाची सत्ता स्थापन करेल : आदित्य ठाकरे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुस्त पडलेल्या राजकारणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेसचा झालेला पराभव आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत झालेल्या सत्कारानंतर राज्यातून घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.
त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील मित्र असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने वेगाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे हेही तत्काळ दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी काल रात्री (१२ फेब्रुवारी) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली, तर थोड्याचवेळात ते आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या भेटीची कारणं आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन विषद केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, काल रात्री राहुल गांधींची भेट घेतली. आज अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहे. वोटर फ्रॉड आणि ईव्हीएम फ्रॉडमुळे आपली मते कुठे जात आहेत हे कळत नाहीय. आपण लोकशाहीत राहतोय असं आपण भासवतोय, हे भासवणं दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. शिवसेना, आप किंवा काँग्रेससोबत जे झालंय, ते उद्या कदाचित बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबत होईल, आरजेडी, चंद्राबाबू यांच्याबरोबरही होईल. भाजपा प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपाची सत्ता स्थापन करेल”, अशी भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. तसंच, पुढील रणनीती म्हणून इंडिया आघाडीसाठी वरिष्ठ नेते रोडमॅप तयार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीकडे संयुक्त नेतृ्त्व आहे. मोठ मोठे नेते नेतृत्व करत आहेत. ही नेतृत्त्वाची लढाई नसून देशासाठी सुरू असलेली लढाई आहे, असंही ते म्हणाले.