
कराड : आगाशिवनगर येथील दांगट वस्तीमध्ये प्रेम संबंधाच्या कारणावरून महिलेवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयीतावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असे अटक असलेल्या संशयीताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर-आगाशिवनगर येथील महिलेचे रवींद्र पवार यांच्याशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी, दि. १३ दुपारी रवींद्र संबंधित महिलेच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. वादावेळी चिडून जाऊन रवींद्र याने स्वत:सोबत आणलेल्या कोयत्याने महिलेवर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला. पोलिसांनी दुसºया दिवशी संशयीत रवींद्र पवार याला वहागाव गावच्या हद्दीतून ताब्यात घेवून अटक केले.
दरम्यान, कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात गत चार दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान सोमवारी तीचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी संशयीतावर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.