तुम्हाला खुर्ची कायम ठेवता आली नाही त्याला मी काय करू’, अजित पवारांचा शिंदेंना चिमटा

मुंबई : महायुती सरकारचा चहापानाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू अनावर झाले. काय घडला हा मजेशीर प्रसंग? जाणून घेऊया.
उद्या अधिवेशन सुरू होणार आहे. आम्ही चहा पानाचे निमंत्रण विरोधकांना दिलं होतं. सरकार चांगले चालावे आणि प्रश्न सुटावे अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक गोष्टला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. आमच्याकडे भक्कम बहुमत असूनही कामकाज आम्ही रेटणार नाही. 4 आठवड्याचे अधिवेशन ठेवले आहे. आरोप प्रत्यारोप होतात, तथ्य असेल तर निर्णय होईल, असे अजित पवार म्हणाले.
जनतेने दिलेला कौल समोर आहे. बंद पडलेल्या अनेक प्रकल्पांना आपण पुढे घेऊन गेलो. अर्थसंकल्प मांडण्याचा अजितदादांना अनुभव आहे. आमच्यात कोल्ड वॉर असल्याच्या बातम्यांकडे आम्ही लक्ष देत नाहीत. विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप केले आम्ही आरोपांना कामाने उत्तर देऊ, त्यांनी चर्चा करावी, असे ते म्हणाले. चहापान हा संवाद असतो, पण विरोधकांनी हट्ट कायम ठेवला. विरोधकांच्या सुडभावनेला त्याच भाषेत उत्तर देऊ असे म्हणत शिंदेंनी विरोधकांना इशारा दिला. मुद्दामहून पेरल्या जाणाऱ्या बातम्या आम्हालाही समजतात. तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज दिल्या तरी आमच्यात काही ब्रेक होणार नाही. आमच्याकडे सर्व थंडा थंडा कुल कुल वातावरण आहे. असे म्हणत शिंदेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या कोल्डवॉरच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संवादाची सुरुवात करताना म्हणाले, ‘आमची टीम जुनीच आहे. फक्त दोघांच्या खुर्च्या बदलल्या आहेत. दादांची कायम आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी अजित दादांना टोला लगावला. पण यानंतर अजित पवारांनी हजरजबाबीपणा दाखवत त्यांना उत्तर दिले. तुम्हाला खुर्ची कायम ठेवता आली नाही त्याला मी काय करू? असा प्रश्न करत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला.