विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार गटाला पहिला झटका

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाली.
तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांची मोठी इनकमिंग दिसून आली. मात्र आता विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप हे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. राहुल जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरही राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र, ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटली. ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी केली होती. माझी उमेदवारी मुंबईवरून नाही तर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने ठरवली आहे. यामुळे मी जनतेचे ऐकणार व अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे. निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला जनतेतून संधी मिळेल असा मला विश्वास व्यक्त करत राहुल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीचा अनुराधा नागवडे आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी बाजी मारली. आता विधानसभेच्या निकालानंतर बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. राहुल जगताप हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.