
कराड : कराड बस स्थानकास 50 बसेस देण्यात यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आगार व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर दुपारी मागे घेण्यात आले.
कराड आगारात सध्या बसेसची संख्या कमी आहे. या पार्श्वभूमीवर आगारास 50 बसेस तातडीने द्यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळपासून बस स्थानक बाहेर अमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. अनिल घराळ व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हे या उपोषणास बसले होते.
दुपारी या उपोषण स्थळी आगारप्रमुख शर्मिष्ठा पोळ व अन्य अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागणीची निवेदन वरिष्ठांकडे पाठवले. कराड आगारास जादा बसेस बाबत वरिष्ठाशी पत्र व्यवहार केला असून सध्या काही बसेस आगारास प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या मागणीचे पत्र वरिष्ठांशी पाठवल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच कराड बस स्थानकास बसेस उपलब्ध करण्यात येतील असे आश्वासन मिळाल्याने संबंधितांनी आमरण उपोषण स्थगित केल्याची माहिती आगर प्रमुख शर्मिष्ठा पोळ यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त महसूल देणारे कराड आगार असून या आगारात सध्या बसेसची संख्या अत्यल्प आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही उपोषण सुरू केले होते, मात्र वरिष्ठांनी या आगारास तात्काळ बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही आज हे उपोषण मागे घेत असल्याचे अनिल घराळ यांनी सांगितले.