विलासराव आतापर्यंतचे सर्वोत्तम मुख्यमंत्री, फडणवीस सध्या जवळचे : अजित पवारांचे खुलासे!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासराव देशमुख यांना आतापर्यंतचे सर्वोत्तम मुख्यमंत्री संबोधले. मराठी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, ‘दिल्लीशी मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले, तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्टाईलने.’ ‘जवळचे मुख्यमंत्री कोण – देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘सध्या फडणवीसच मुख्यमंत्री आहेत, म्हणून तेच जवळचे. मी कोणाला नाराज करणार नाही.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार म्हणाले, “एसआयटी आणि सीआयडी नेमली आहे. धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही आलेले नाही. मारहाणीचे फोटो पाहून आम्हालाही वेदना झाल्या. चर्चेनंतर मुंडे यांनी राजीनामा दिला. चुकीचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, कोणालाही पाठीशी घालणार नाही.”
“कायद्याचे पालन सर्वांनी करावे, ही माझी भूमिका आहे. बीड असो वा पुणे, चुकीवर कारवाई होईल,” असे पवारांनी ठासून सांगितले. ते म्हणाले, “जल, हवाई आणि रस्ते वाहतूक महत्त्वाची आहे. पुणे विद्येचे माहेरघर आहे, तिथे रस्ते आणि रिंग रोडची कामे सुरू करू. सार्वजनिक वाहतूक भक्कम करणार.” छगन भुजबळांबाबत ते म्हणाले, “त्यांना राज्यसभेवर पाठवायचे होते, पण नाराज करण्याचा हेतू नव्हता.”
औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर पवार म्हणाले, “शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकरांनी सलोखा राखला. कारण नसताना गैरसमज पसरवण्याला माझा विरोध आहे. मंत्र्यांनी तारतम्याने बोलावे, हे प्रकरण उकरून कशाला काढायचे?”
“फडणवीस हे मोदी-शहा यांचे जवळचे आहेत, हे मला माहीत आहे. भाजपचे १२७ आमदार होते, आमचे ४१, त्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट होते. मी व्यवहारी आहे, म्हणून उपमुख्यमंत्री झालो,” असे पवार म्हणाले. “१९८५ नंतर राज्यात एकहाती सरकार आले नाही. प्रत्येकाला युती करावीच लागते, एकट्याचे सरकार येणे कठीण आहे,” असेही ते म्हणाले.