
कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू मध्ये सध्या लोकांना लुबाडण्याचा धंदा जोमाने सुरू आहे. हम करे सो कायदा याप्रमाणे येथील कारभार सध्या चालत असून त्याच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सेतू कार्यालयात रोज ग्रामीण व शहरी भागातून हजारो विद्यार्थी व नागरिकांची ये-जा होत असते. लोकांशी इज्जतीने न वागल्याने येथील कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार व प्रांत यांनी सेतू ठेके चालकास योग्य ती समज देऊन कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.
रिद्धी कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीस कराड तहसील कार्यालयाचा ठेका चालवण्यासाठी देण्यात आला होता. त्याची मुदत लवकरच संपणार असून कराड तहसील कार्यालयातील सेतू ठेका चालवण्यासाठी या कंपनीस एक वर्षाची मुदतवाढ द्यायची अथवा नाही याबाबत स्वयं स्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याबाबतचे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून कनिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहे.
रिद्धी कॉर्पोरेट सर्विसेस लिमिटेड या कंपनीने तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला असून कंपनीस ठेका मिळालेल्या दिवसापासून सामान्य जनतेची लूट केलेले असून त्यांनी प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक दाखल्या मागे ज्यादा 16 रुपये जास्त घेतल्याचे दिसून आल्यानंतर या कंपनी विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सो सातारा तसेच विभागीय आयुक्त सो पुणे यांच्याकडे जादाची रक्कम वसूल करून घेण्याबाबत रीतसर पुरावे जोडून तक्रारी अर्ज दिलेला आहे.
या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सो सातारा यांच्या कार्यालयाकडून चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे रिद्धी कॉर्पोरेट सर्विसेस लिमिटेड या कंपनीने सामान्य लोकांच्याकडून घेतलेली जादाची रक्कम वसूल करून घेतल्याशिवाय त्यांना मुदतवाड देण्यात येऊ नये जर ज्यादाची रक्कम वसूल न करता या कंपनीत एक वर्षाची मुदत वाढ दिल्यास या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्याकडून आंदोलन अथवा अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्राचा ठेका चालवण्यासाठी कंपनीने नक्की कोणाला व्यवस्थापक म्हणून नेमलेले आहे ते समजून येत नसून या कार्यालयामध्ये अनेक लोक त्या ठेक्याचे मालक असल्यासारखे लोकांशी वागत आहेत. याबाबत अधिकारी वर्गाने लक्ष घालून याबाबत योग्य ती कारवाई करणार का याबाबत तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये चर्चा सुरू आहे.
सध्या सेतू कार्यालयात दंडलशाहीचा प्रकार पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांना दमदाटी व दमबाजी करून त्यांच्याकडून अवाढव्य पैसे उकळले जात असल्याचे दिसून येत आहे. या सेतू कार्यालयात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची व तेथे विनाकारण वावरत असणाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कान उघडनी करून त्यांना योग्य समज द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.