
कराड ः कराड शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या मोबाईलचा कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने छडा लावला आहे. यामध्ये 5 लाख 70 हजार रूपये किमतीचे 29 मोबाईल शोधून काढून शनिवारी पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना देण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना कराड शहर हे सातारा जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असून पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ तसेच चोरी होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेश केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास चोरीस गेलेल्या मोबाईलचा छडा लावण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व डीबी पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाणेच्या माध्यमातून माहिती प्राप्त करून सदर माहितीचे पोलीस अंमलदार संग्राम पाटील व महेश शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण करत महाराष्ट्र राज्याचे विविध भागातून तसेच इतर राज्यातून 5 लाख 70 हजार रूपये किमतीचे मोबाईल परत मिळवत तक्रारदार यांना शनिवारी परत केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, संग्राम पाटील, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांनी केली आहे.