
कराड : मलकापूर येथील किर्लोस्कर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन दयानंद गोरे व त्यांची पत्नी विजया गोरे या दोघांना ज्या पतसंस्थेने कर्ज दिले त्या पतसंस्थेने सहकर्जदार विजया गोरे यांना कशाच्या आधारे कर्ज दिले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक बँका, पतसंस्था ह्या मोडकळीस आलेल्या आहेत. आपण सर्वजण पाहत आहोत कोणतेही कर्जपुरवठा करताना बँका पतसंस्था तारण घेतल्याशिवाय कर्जपुरवठा करत नाहीत. मात्र मलकापूर येथील गजानन नागरी सहकारी पतसंस्थेने विजया गोरे यांच्या नावे कोणतीही जमीन अथवा बँकेकडे कोणतेही तारण नसताना त्यांना 25 लाख रुपये चा कर्ज पुरवठा कशाच्या आधारे केला याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीस बँका, पतसंस्था विनाकारण कर्जपुरवठा करत असेल तर अशा पतसंस्था मोडकळीस यायला वेळ लागत नाही. सर्वसामान्यांच्या पैशाचा असा पतसंस्थेने गैरवापर करून मर्जीतल्या लोकांना विनातारण कर्जपुरवठा केल्याने लवकरच गजानन नागरी सहकारी पतसंस्था मोडकळीस निघायला वेळ लागणार नाही. सध्या कराडात भल्या भल्या समजल्या जाणाऱ्या जनता बँक, शिवशंकर पतसंस्था असो अथवा आत्ता जे यशवंत बँकेचे सुरू असलेले प्रकरण असो या बँके मध्ये झालेला गैरप्रकार हे उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. जर या गजानन नागरी पतसंस्थेने जर चुकीच्या रितीने कर्जपुरवठा केला असेल तर यावर उपनिबंधक कार्यालयाकडून आजपर्यंत कोणतीच कारवाई का झाली नाही, गोरगरिबांचा पैसा धन दांडग्यांच्या व्यवहारात असा खिरापती गत का वाटला जातो याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
दि. 2-4-1975 रोजी तात्याबा मार्तंडा देवकर यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी त्या खरेदी पत्रावरती खरेदी घेणार म्हणून नियोजित किर्लोस्कर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था कराडचे चेअरमन श्री. बाबासाहेब आनंदराव गोरे असा उल्लेख असलेले खरेदीपत्र आहे व सण 1978 ते सण 2012 पर्यंत सातबारा वरती असाच उल्लेख असल्याचे दिसून येत आहे. तसेच 2012 ते 2020 पर्यंत नियोजित किर्लोस्कर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन दयानंद बाबासो गोरे असा उल्लेख सातबारा उताऱ्या वरती दिसून येत आहे.
परंतु अशी कोणती अडचण निर्माण झाली की सण 2021 साली नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेचे नाव कमी करून एकट्या दयानंद बाबासाहेब गोरे यांचेच नाव सातबारा उताऱ्या वरती ठेवण्याची वेळ आली. नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेचे नाव कमी करून फक्त दयानंद बाबासाहेब गोरे यांचेच नाव सातबारा उतारा वरती लावण्याबाबत त्यांच्या मासिक अथवा वार्षिक मीटिंगमध्ये याबाबत चर्चा झाली होती का? तसेच याबाबत तसा ठराव झाला आहे का तसा ठराव झाला असल्यास तो कोणत्याही कोर्ट केस कामी अथवा इतरत्र कोठे दाखल करण्यात आला आहे का?
सण 2021 मध्ये नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेचे नाव कमी झाल्यानंतर फक्त दयानंद बाबासो गोरे यांचेच नाव सातबारा सदरी दिसून येत होते. तसेच त्यांनी श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर तालुका कराड या संस्थेकडून 55 लाख रुपये एवढी रक्कम व्यवसायासाठी कर्ज मागणी केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी केलेल्या कर्ज मागणी नुसार पतसंस्थेने मौजे मलकापूर येथील बिनशेती जमीन/प्लॉट मिळकती वरती 55 लाख रुपयाचे दि. 3 – 3 – 2022 रोजी तारण गहाण खत लिहून घेतले होते.
व्यवसायासाठी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जास नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेचे असलेले 117/17ई प्लॉट नंबर 5, 6, 7, 8 हे प्लॉट पतसंस्थेस तारण गहाण दिल्यानंतर पतसंस्थेने दयानंद बाबासाहेब गोरे यांना 30 लाख रुपये व सह कर्जदार सौ. विजया दयानंद गोरे यांच्या नावे 25 लाख रुपये असे दोघांचे मिळून 55 लाख रुपये कर्ज गजानन नागरीक पतसंस्थेने दिले होते त्या दिलेल्या कर्जाची रक्कम ही या दोघांना मिळाली होती.
परंतु पतसंस्थेने कर्जासाठी जे प्लॉट तारण घेतले होते त्या प्लॉट वरती फक्त दयानंद बाबासाहेब गोरे यांचेच नाव होते तसेच या चार प्लॉट वरती विजया दयानंद गोरे यांचे नाव नमूद नसताना तसेच या चार प्लॉट व्यतिरिक्त पतसंस्थेने विजया गोरे यांच्या नावाची कोणतीही प्रॉपर्टी तारण न घेता विजया गोरे यांना सह कर्जदार म्हणून 25 लाख रुपयांचे कर्ज कोणत्या आधारावरती दिले याचा उलगडा होणे गरजेचे आहे.
पतसंस्थेने हे कर्ज दि. 3 – 3 – 2022 रोजी दिले होते तर सण 2021 ते 2022 च्या पतसंस्थेने केलेल्या वैधानिक लेखा परीक्षण (ऑडिट) मध्ये ही बाब निदर्शनास आली होती का? जर पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये ही बाब निदर्शनास आली नसेल तर हा ऑडिट रिपोर्ट लेखा परीक्षण कार्यालय कराड यांच्याकडे छाननी साठी पाठवला जातो तरी गजानन नागरी सहकारी पतसंस्थेने सहकर्जदार विजया दयानंद गोरे यांच्याकडून त्यांच्या नावे असणारी कोणतीही प्रॉपर्टी तारण न घेता त्यांना 25 लाखाचे कर्ज कसे काय दिले हे लेखा परीक्षण कार्यालय कराड यांच्या निदर्शनास आले आहे का जर आले असेल तर त्यांनी याबाबत कोणती कारवाई केली आहे का?
तसेच सहकर्जदार यांच्या नावाची कोणतीही प्रॉपर्टी कारण न घेता त्यांच्या नावे कर्ज देता येते का? जर तसे कर्ज देता येत नसेल तर त्या संस्थेवरती योग्य ती कारवाई व्हावी कारण आज पर्यंत तारण न घेता तसेच थोड्या प्रॉपर्टी वरती मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्यामुळे अनेक बँका व पतसंस्था दिवाळीखोरीत निघाल्या असून यामध्ये सर्व सामान्य ठेवीदारांचे खूप मोठे नुकसान होऊन ते अडचणीत आले आहेत. यासाठी अशा भानगडी करणाऱ्या संचालक मंडळावरती वेळीच योग्य ती कारवाई झाल्यास अशा चुकीच्या गोष्टींना आळा बसेल अशी जनतेतून मागणी होत आहे.
सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर या संस्थेचे चेअरमन हे कंपनीचे कामगार नसताना ते नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेचे सभासद कसे काय झाले याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सोमवार दि. 19 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या पुढील भागात
संस्थेचे मनमर्जी सभासद व संस्थेचे झालेले ठराव योग्य की अयोग्य