
कराड : शिक्षण घेत असताना गुरुजनांचे मार्गदर्शन तर होत असते परंतु शिक्षणाच्या योग्य टप्प्यावरती आल्यानंतर पालकांच्या मार्गदर्शनाची गरज असते असे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केले.
आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पाडळी (केसे),तालुका कराड गावची सुकन्या कु.आलिया इरफान मुजावर हिने इयत्ता दहावी मध्ये 92 टक्के गुण मिळवून यश मिळवल्याबद्दल गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रताप पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता ओळखून योग्य वेळी योग्य ते पालकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना दिशा देण्याची गरज आहे.
स्वागत व प्रास्ताविकामध्ये विश्वास मोहिते म्हणाले, कुमारी आलिया इरफान मुजावर हिने इयत्ता दहावी मध्ये यश संपादन करून स्वतःचा, कुटुंबाचा, त्याचबरोबर गावाचा नावलौकिक वाढविला तो अभिमानास्पद आहे.
यावेळी पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी दीपक कराळे, संपतराव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन, असलम मुल्ला, सह ग्रामस्थ उपस्थित होते.