
कराड : मलकापूर येथील नियोजित कामगार गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून यामध्ये अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. या नियोजित कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेची असलेली जमीन आपल्या मुलाच्या नावाने मृत्युपत्र कसे केले हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. वैयक्तिक प्रॉपर्टी चे मृत्युपत्र करता येते. मात्र, संस्थेच्या प्रॉपर्टीचे मृत्युपत्र करता येते का याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यामध्ये ते आजारी असताना डॉक्टरांनी त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट देताना ते व्यवस्थित असल्याचे दिले आहे जर ते व्यवस्थित होते तर त्यांनी सही करण्याऐवजी अंगठा का केला हा सुद्धा तपासाचा भाग येत आहे यामध्ये पोलिसांनी आजपर्यंत कशाच्या आधारे कशाकशाचा तपास केला हेही पाहणे गरजेचे होणार आहे.
नियोजित कामगार गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीचे मृत्युपत्र अध्यक्षांनी त्यांच्या वारसांना करून दिले तर ते कायदेशीर दृष्ट्या वैध नाही. कारण संस्थेची जमीन संस्थेच्या सदस्यांची सामूहिक मालकी असते आणि अध्यक्षांना स्वतःच्या नावाने त्या जमिनीचे मृत्युपत्र करण्याचा कोणताही अधिकार नसतो. कामगार गृहनिर्माण संस्थेची जमीन संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येऊन खरेदी केलेली असते अथवा ती एकत्रित मिळवलेली असते त्यामुळे ती कोणत्याही एका सदस्याची वैयक्तिक मालमत्ता नसते. तसेच संस्थेचे अध्यक्ष हे संस्थेचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नियुक्त केलेले असतात त्यांचा संस्थेच्या मालमत्तेवर कोणताही वैयक्तिक अधिकार नसतो. कायद्यामध्ये असे असतानाही नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या जमिनीचे मृत्युपत्र बाबासाहेब आनंदराव गोरे यांनी त्यांच्या मुलाला करून देण्याचा उद्देश काय होता.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेची जमीन ही बाबासाहेब आनंदराव गोरे यांची वैयक्तिक नसतानाही त्यांनी दि. 20/12/2012 रोजी या जमिनीच्या मृत्युपत्राचा दस्त तयार करून दि. 21/12/2012 रोजी आपल्या मुलाच्या नावाने रजिस्टर मृत्युपत्र करून दिलेली आहे. हे मृत्युपत्र करून ठेवता वेळेस त्यामध्ये साक्षीदार म्हणून बाबासाहेब आनंदराव गोरे यांचा लहान मुलगा संजय बाबासो गोरे याने सही केलेली आहे असे दिसून येत आहे. तसेच मृत्युपत्रामध्ये असे नमूद केलेले आहे की माझा थोरला मुलगा दयानंद बाबासो गोरे हा संस्थेचे चेअरमन या नात्याने योग्य प्रकारे कामे करील त्याची मला खात्री असल्यामुळे माझे हयातीनंतर वरील नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्था कराड या संस्थेची सर्व मिळकत सदर नियोजित संस्थेचा चेअरमन या नात्याने माझा मुलगा दयानंद बाबासो गोरे यांनी आपल्या ताब्यात घेऊन सदर जमीन मिळकतीचा बिन शेतीसारा व इतर सरकारी कर बाब देत जाऊन व संस्थेची यापूर्वीची अपुरी कामे पूर्ण करून व या पुढील कायदेशीर सर्व कामे करून उपभोग निरंतर मालकी हक्काने व मर्जीप्रमाणे करणेचा आहे. असे मृत्युपत्र मध्ये नमूद केलेले आहे.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेचे बाबासाहेब आनंदराव गोरे यांनी मृत्युपत्र बनवताना डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले आहे त्यामध्ये त्यांना मधुमेह व हृदयविकाराचा त्रास असल्याचे नमूद केलेले आहे तसेच ते काम करण्यास फिट आहेत असे नमूद केलेले आहे. जर ते काम करण्यास फिट आहेत असे डॉक्टर सर्टिफिकेट देत आहेत तर मृत्युपत्र करताना त्यांनी त्यांची सही करताना हाताचा अंगठा दिलेला दिसून येत आहे व मृत्युपत्रांमध्ये असे नमूद केलेलं दिसून येत आहे की पूर्वी मी सही करीत होतो परंतु आत्ता वरील आजारामुळे अशक्तपणा आलेला असल्यामुळे हात थरथर कापत असल्यामुळे मी सही न करता मी माझा निशाणी अंगठा दिलेला आहे. जर त्यांना अशक्तपणा आला असेल व त्यांचे हात थरथर कापत असतील तर डॉक्टरांनी दिलेले फिटनेस सर्टिफिकेट व ते देत असलेले जवाबामध्ये तफावत दिसून येत आहे. तसेच त्यांनी मृत्युपत्र करून ठेवल्यानंतर 2 महिने 13 दिवसानंतर ते मयत झालेले आहेत.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेमध्ये सध्या दोन गट पडलेले आहेत यामध्ये दयानंद बाबासाहेब गोरे यांच्याकडे 34 सभासद असल्याचे बोलले जात आहे तर मधुकर आनंदा चवरे यांच्याकडे 21 सभासद असल्याचे दिसून येत आहे. नियोजित किर्लोस्कर कामगार गनिर्माण संस्थेचे चेअरमन बाबासाहेब आनंदराव गोरे हे दि. 4 – 3 – 2013 रोजी मयत झाल्यानंतर त्यांचा मुलगा दयानंद बाबासाहेब गोरे यांना सभासद करून त्यांना या संस्थेचे चेअरमन करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे ज्यावेळी त्यांना चेअरमन करण्यात आले होते त्या सभेला 34 सभासद हजर असल्याचे बोलले जात आहे. परंतु बाबासाहेब आनंदराव गोरे यांना वारस पत्नी दोन मुले व दोन मुली असे एकूण पाच वारस असताना त्यापैकी दयानंद बाबासाहेब गोरे यांनाच या संस्थेचे सभासद पद कोणत्या आधारावरती देण्यात आले हा महत्त्वाचा भाग आहे. तसेच दयानंद गोरे यांना ज्यावेळी सभासद करून चेअरमन करण्यात आले होते त्या सभेला 34 सभासद होते का की त्यातील मयत सभासदांचे काही वारस होते जर 34 सभासदांपैकी काही मयत सभासदांचे वारस असतील तर त्या वारसांना सभासद कोणी व कसे केले याचेही चौकशी झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे.
*पुढील भागात – चुकीच्या मृत्युपत्राची चौकशी होऊन दोषींवरती गुन्हा दाखल होणार का ?*