
कराड : मलकापूर येथील नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था गेली अनेक दिवस कराड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणात रोज ऐकावे ते नवलच अशा भानगडी समोर येत आहेत. या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये मोठा घोळ असून या संपूर्ण प्रकरणाची अगदी योग्य प्रकारे चौकशी होणे गरजेचे आहे. या गृहनिर्माण संस्थेच्या असणाऱ्या चेअरमन यांनी संस्थेच्या जागेचे मृत्युपत्र आपल्या मुलाच्या नावे कसे बनवले यांचे गौडबंगाल काय आहे तसेच जेव्हा मृत्युपत्र बनवले त्यावेळी असणारे नाव आणि मृत्युपत्रात आणि फेरफार वर लागलेले नाव यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसून येत आहे. फेरफार व मृत्युपत्रांमध्ये चक्क बापच बदलल्याने या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर येत आहे.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सभासदांनी एकत्र मिळून सर्वांना हक्काची घरे असावी म्हणून सर्वांनी एकत्रित जमीन खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले होते. तसेच बाबासाहेब गोरे यांच्या वरती विश्वास ठेवून सर्व सभासदांनी नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित कराडचे चेअरमन बाबासाहेब आनंदराव गोरे असे खरेदीपत्र तात्याबा मार्तंडा देवकर यांच्याकडून रजिस्टर खरेदीपत्र करून घेण्यात आले होते. परंतु बाबासाहेब आनंदराव गोरे यांना अधिकार नसतानाही संस्थेच्या नावाच्या जमिनीचे मृत्युपत्र त्यांचा मोठा मुलगा दयानंद बाबासाहेब गोरे यांच्या नावावरती करून दिलेले आहे.
दि. 21/12/2012 रोजी नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीचे अधिकार नसतानाही बाबासाहेब आनंदराव गोरे यांनी त्यांच्या मुलाच्या नावे केलेल्या मृत्युपत्रमध्ये त्यांचा आयडेंटी पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र जोडलेले आहे. परंतु या मतदान ओळखपत्रावरती बाबासो अंतोबा गोरे असे नाव नमूद आहे. तसेच संपूर्ण रजिस्टर मृत्युपत्रा मध्ये बाबासाहेब आनंदराव गोरे व बाबासो अंतोबा गोरे या दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्याबाबतचा कोणताही लेखी उल्लेख अथवा कागद या रजिस्टर मृत्युपत्राला जोडलेला नाही.
तसेच नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था कराड या जमिनीस दयानंद बाबासाहेब गोरे यांचे नाव दाखल करण्यात आले आहे तो फेरफार नंबर 20920 दिनांक 20/5/2013 रोजी धरण्यात आला होता तो दि.4/7/2013 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे हा फेरफार मंजूर करताना खातेदार बाबासो अंतोबा गोरे हे गावी दिनांक 4/3/2013 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत मुलगा दयानंद बाबासो गोरे, संजय बाबासो गोरे, पत्नी आशा बाबासो गोरे, मुलगी भारती विलास शिंदे, सुनिता जगन्नाथ शेडगे वरील प्रमाणे मयतास वारस असून स्थानापन्न कब्जेदार म्हणून वा.र.नं.1039 प्रमाणे व दिनांक 21/12/2012 रोजीचे रजिस्टर मृत्युपत्र प्रमाणे चेअरमन दयानंद बाबासो गोरे यांचे नाव दाखल केले प्रकरण फायलीस दाखल असे नमूद करून फेरफार तयार करण्यात आलेला आहे.
मुळात बाबासाहेब आनंदराव गोरे यांचे मृत्युपत्र बनवताना आयडेंटी पुराव्यामध्ये बाबासो अंतोबा गोरे असे नाव नमूद असताना रजिस्टर मृत्युपत्र कसे काय तयार करण्यात आले. तसेच त्या मृत्युपत्राच्या आधारे फेरफार तयार करताना तलाठी व मंडल अधिकारी यांनीही बाबासाहेब आनंदराव गोरे यांचे नाव नमूद न करता बाबासो अंतोबा गोरे असे नाव नमूद केले असताना बाबासो अंतोबा गोरे यांना वारस दयानंद बाबासो गोरे हे आहेत हे कोणत्या कागदपत्राच्या आधारावरती सिद्ध करून फेरफार वरती त्यांचे वारस म्हणून नाव दाखल करून सातबारा वरती नाव नोंद केलेले आहे.
बाबासाहेब आनंदराव गोरे व बाबासो अंतोबा गोरे या दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्याबाबतचा कोणताही कागदपत्री पुरावा समोर आलेला नसताना तसेच मृत्युपत्रांमध्ये आयडेंटी पुरावा म्हणून जोडलेल्या कागदपत्रावरती बाबासो अंतोबा गोरे असे नाव नमूद असताना तसेच फेरफार तयार करताना त्यावरतीही बाबासो अंतोबा गोरे असे नाव नमूद केलेले असताना दयानंद बाबासो गोरे यांचे नाव सातबारा सदरी कसे काय दाखल करण्यात आले. बाबासाहेब आनंदराव गोरे व बाबासो अंतोबा गोरे या दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्याबाबतचा कोणता पुरावा तलाठी व मंडलाधिकारी यांनी पाहून दयानंद गोरे यांचे नाव सातबारा सदरी लावलेले आहे.
मृत्युपत्रासाठी जोडलेल्या आयडेंटी पुराव्यामध्ये बाबासो अंतोबा गोरे असे नाव नमूद आहे तर ते बनवलेले मृत्युपत्र बाबासाहेब आनंदराव गोरे यांचेच कशावरून आहे असा विषय कागदपत्रे पाहिल्यानंतर समोर येत आहे. मग झालेले मृत्युपत्र कायदेशीर दृष्ट्या बरोबर आहे का याची चौकशी होणे आवश्यक आहे.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था कराड या जमिनीच्या सातबारा सदरी दयानंद बाबासो गोरे यांचे नाव ज्या फेरफार ने लागलेले आहे मुळात तो फेरफार चुकीचा तयार झालेला आहे त्यामुळे ज्या फेरफारमुळे दयानंद गोरे यांचे नाव लागलेले आहे तो फेरफार रद्द व्हायला हवा. तसेच ते झालेले मृत्युपत्र त्या अनुषंगाने झालेला फेरफार व त्या फेरफारच्या अनुषंगाने सातबारा सदरी दयानंद बाबासो गोरे यांचे लागलेले नाव या चुकीच्या पद्धतीने झालेला फेरफार या फेरफार च्या अनुषंगाने सातबारा सदरी चेअरमन म्हणून लागलेले नाव तसेच चेअरमन या नात्याने संस्थेच्या घेतलेल्या सभा, केलेले ठराव, केलेल्या तडजोडी, वापरलेले सही शिक्के हे कायदेशीर ठरतात का या सर्वांची चौकशी व्हावी.
तसेच दयानंद बाबासो गोरे यांची नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था कराड या संस्थेच्या चेअरमन पदी 10/5/2013 रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक पाचने चेअरमन म्हणून 34 सभासदांनी मान्यता दिली होती. असे दयानंद गोरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केलेले आहे. तर दयानंद गोरे यांच्या नावाची सातबारा सदरी त्या ठरावाने नोंद होणे अपेक्षित होते. परंतु दयानंद गोरे यांची नावाची नोंद मृत्युपत्राच्या आधारे का करण्यात आली आहे. या सर्वाची चौकशी होऊन दोषीच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी.
पुढील भागात – तपास अधिकारी यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीची वरिष्ठांकडून चौकशी होणार का?