
कराड : मॉर्निंग वॉकला गेलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मिनी गंठण चोरट्यांनी हिसकावले. सैदापूर-विद्यानगर येथील उंडाळकर हॉस्टेलनजीक सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत प्रियंका गोरखनाथ सूर्यवंशी (रा. ज्ञानेश्वर कॉलनी, सैदापूर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथील ज्ञानेश्वर कॉलनीत राहणार्या प्रियंका सूर्यवंशी या सोमवारी सकाळी त्यांच्या मैत्रिणींसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या मॉर्निंग वॉक करून परत घराकडे येत असताना उंडाळकर हॉस्टेलनजीक दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ येऊन थांबले. संबंधितांनी प्रियंका सूर्यवंशी यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावले. त्यावेळी प्रियंका यांनी गंठणची चैन हातात पकडल्यामुळे गंठणमधील सोन्याच्या वाट्या आणि काही मनी असा 30 हजारांचा ऐवज घेऊन चोरटे तेथून पसार झाले. याबाबत प्रियंका सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.