
कराड ः गुरूवार पेठ येथील भाजी मंडई, कसाईवाडा व मुजावर कॉलनी येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर डीवायएसपी पथकाने शुक्रवारी सकाळी छापा टाकला. यामध्ये कत्तलीकरीता बांधून ठेवलेली 40 जनावरे आढळून आली. तसेच 1 हजार 580 किलो मांस कातडेसह आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून यामध्ये आणखी संशयित वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी वाहतुकीकरीता वापरत असलेली दोन चारचाकी वाहने व एक तीन चाकी वाहनही जप्त केले आहे.
मज्जीद हमीद बेपारी, अब्दुल रेहमान बापुसाहेब बेपारी, फारूख कुतबुद्दीन बेपारी, बशीर कादीर बेपारी, नदीम असलम बेपारी, मोहम्मद हारूण बेपारी (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, कसाईवाडा, गुरूवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कराड शहर व परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम याची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डीवायएसपी अमोल ठाकूर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस हवालदार प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांना शहानिशा करणेकरीता भाजी मंडई, कसाईवाडा येथे पाठविले असता त्याठिकाणी वरील सहा जणांनी आपसांत संगणमताने बेकायदा बिगरपरवाना गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मांस विक्री व वाहतुक करीत करून गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेली आढळून आले. तसेच 1 हजार 580 किलो मांस कातडेसह आढळून आले. तसेच मुजावर कॉलनी येथे देखील 4 गोवंश जातीच्या गाई कत्तलीसाठी बांधून ठेवल्याच्या आढळून आल्या. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अझरूद्दीन शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने, आर.सी.पी. पथक यांचे सहाय्याने तात्काळ गोवंशाची सुटका करून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी सहाजणांना अटक करून त्यांच्याकडून वाहतुकीकरीता वापरत असलेली दोन चारचाकी वाहने व एक तीन चाकी वाहने जप्त केली आहेत.
सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, वाचन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अझरूद्दीन शेख, शितल माने, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, पोलीस हवालदार महेश लावंड, प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, वसीम संदे, शशि काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, सागर भोसले, सोनाली पिसाळ व आर.सी.पी. प्लटुन यांनी केली.