मनसे जर महायुती मध्ये येत असेल तर राष्ट्रवादी त्यांचे स्वागत करेल : आनंद परांजपे

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसून येतायेत.
काल याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत येण्यावर चर्चा झाली असल्याचे समजते. अशात आता राष्ट्रवादीची (अजित पवार गट) प्रतिक्रिया समोर आली आहे.
महायुतीत मनसे देखील सामील होणार असल्यामुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून देखील सावध पवित्र घेतला जातोय. अशात आता मनसेच्या एंट्रीबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आम्ही त्यांचे महायुतीत स्वागत करू असं म्हंटल आहे.
महायुतीमधील सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे. एकनाथ शिंदे अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे तिघेही बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील. मनसे जर महायुती मध्ये येत असेल तर राष्ट्रवादी त्यांचे स्वागत करेल असं स्पष्ट मत परांजपे यांनी व्यक्त केलं आहे.एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी प्रसारित केली आहे.
मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण मुंबई येथे अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे तर, शिर्डीच्या जागेवर बाळा नांदगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे. लॅन्डस येथे झालेल्या बैठकीनंतर शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत बातचीत होणार असल्याचे समजते.