
कराड : तालुक्यातील सुपणे येथील यशवंत सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या जाकवेलमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४२ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही चोरी २४ जुलै ते २६ जुलै २०२५ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी मोटार ऑपरेटर संदीप साळुंखे (रा. साकुर्डी) यांनी कराड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
संदीप साळुंखे हे गेली ९ वर्षे संस्थेत मोटार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. २४ जुलै रोजी दुपारी ११ वाजता नेहमीप्रमाणे पंपहाऊस तपासणीसाठी गेले असता सर्व यंत्रणा सुरळीत होती.
मात्र २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पुन्हा पंपहाऊस गाठले असता जाकवेलचा दरवाजा उघडा दिसून आला. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता कोपरच्या पट्ट्या, कपॅसिटर, केबल, नटबोल्ट व पाणे असा अंदाजे ४२,००० रुपयांचा साठा गायब असल्याचे लक्षात आले.
चोरीची खात्री झाल्यानंतर साळुंखे यांनी तात्काळ संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक यांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेवरून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.