राज्य

आता सर्पमित्रांनाही ओळखपत्रासह १० लाखांचा अपघात विमा…….! : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्याच्या विशेषतः ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, खास करून सापांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा गुरुवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली. तसेच त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.

यासंदर्भात आज मंत्रालयात त्यांनी एक आढावा बैठक घेऊन यासंदर्भातल्या सर्पमित्रांच्या परिस्थितीही त्यांनी जाणून घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासातून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सर्पमित्र नेहमीच धावून येतात.अनेकदा आपला जीव धोक्यात घालून ते सर्पांना पकडून सुरक्षित स्थळी सोडून देतात. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना अपघात विमा मिळावा अशी बऱ्याच काळापासून मागणी होती. त्यामुळेच आता सर्पमित्रांनाही अधिकृत ओळखपत्र देण्याबरोबरच त्यांना १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याची योजना आखण्यात येत असून यासाठी सविस्तर कार्यपद्धतीही तयार केली जाईल. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला अधिकृत मान्यताही मिळेल आणि त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याशिवाय सर्पमित्रांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेता त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून घोषित करण्याची आणि आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आजच्या बैठकीला वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम.श्रीनिवास राव, अखिल भारतीय सर्पमित्र आणि प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

आता सर्व सर्पमित्रांची अधिकृत माहिती उपलब्ध होण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती वनविभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे गरजूंना तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधणे सोपे होईल आणि त्यांच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल तसेच वन्यजीव संरक्षणात त्यांचा सहभाग अधिक वाढेल, अशी अपेक्षा मिलिंद म्हैसकर यांनी बैठकीत व्यक्त केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close