
कराड : विवाहितेवर वारंवार अत्याचार करून तीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केल्याप्रकरणी एकावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबतची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेची संशयीताशी ओळख झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेत त्याने विवाहितेशी जवळीक वाढवली. तसेच तुझे इतरांशी बोलतानाचे फोटो माझ्याकडे आहेत. ते फोटो घरी दाखवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत त्याने 10 मे 2023 पासून विवाहितेवर वारंवार अत्याचार केला.
सुरुवातीला भीतीपोटी विवाहितेने याबाबतची माहिती कोणालाही दिली नाही. मात्र, संशयीताने वारंवार हाच प्रकार केल्यामुळे पिडीतेने याबाबत आपल्या भावाला माहिती दिली. भावाने संशयीताला बोलावून घेत त्याला समज दिली होती. मात्र, त्यानंतरही त्याने पिडीतेला त्रास देणे सुरूच ठेवले.
दरम्यानच्या कालावधीत संशयीताने पीडितेच्या नावाने अश्लील वेबसाईटवर खाते उघडले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतरही संशयीताला ताकीद देण्यात आली होती. तसेच पिडीता कुटुंबासह मुंबईला राहण्यास गेली. मात्र, तरीही संशयीताकडून तिला त्रास देणे सुरूच होते. चार दिवसांपुर्वी त्याने पिडीतेचा काढलेला एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केला. हा व्हिडिओ पीडितेच्या कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. याबाबत पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.