
कराड : बनावट सोन्याच्या व्यवहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असून एका सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे तिघे बनावट सोन्याची बिस्कीटे विक्रीस आणून तब्बल 50 लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते.
गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीत राहणार्या आसिफ अकबर मुल्ला यांचे ‘रॉयल ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एकजण दुकानात दाखल झाला. अंगात पांढरा फुलबाह्यांचा शर्ट घातलेल्या त्या व्यक्तीने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचे सांगून, माझ्याकडे चोवीस कॅरेटचे 500 ग्रॅम शुद्ध सोने आहे, ते मला विकायचे आहे, असे सांगितले. गोविंद पदातुरे याने त्याच्याकडे असलेल्या बिस्किटांपैकी एक बिस्कीट पांढर्या प्लास्टिक पिशवीतून काढून आसिफ मुल्ला यांना दाखवले. हे बिस्कीट पाहताक्षणीच खरे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला. त्याचवेळी गोविंद याने आपल्या मित्राच्या घरी गजानन हौसिंग सोसायटी येथे व्यवहार करू, असे सुचवले. असिफ मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंद याची नजर चुकवून कराड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोमीन यांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत उपनिरीक्षक सांडगे यांना कारवाईसाठी पाठवले.
असिफ मुल्ला हे गोविंदसोबत दुचाकीवरून गजानन हौसींग सोसायटी येथे गेले. त्याठिकाणी सर्जेराव कदम व अधिक गुरव हे दोघे उपस्थित होते. तिघांनी मिळून बनावट सोन्याच्या 10 बिस्किटांचा व्यवहार सुमारे 50 लाख रुपयांना रोख रक्कमेत करण्याची बोलणी सुरू केली. याचवेळी पोलीस निरीक्षक निलेश तारु, उपनिरीक्षक निखिल मगदुम, पोलीस नाईक संतोष पाडळे, शिपाई अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मुकेश मोरे, संग्राम पाटील यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. पंच आणि सोनार यशवंत देवकर यांच्या उपस्थितीत तिघांची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्यांच्या खिशातून बनावट सोन्याची 11 बिस्किटे सापडली. पोलीसांनी गोविंद पदातुरे, सर्जेराव कदम आणि अधिक गुरव यांना ताब्यात घेतले असून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.