
कराड ः शहर पोलिसांनी आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील आरोपींची गुरूवारी झाडाझडती घेतली. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या अनेकांना पोलिसांनी चांगलीच तंबी दिली. तसेच सुमारे 30 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. उत्सव कालावधीत गुन्हा घडल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिला आहे.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह परिसरातील उपनगरांचा बहुतांश भाग येतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक सार्वजनिक गणेश मंडळे कार्यरत आहेत. शहर तसेच उपनगरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याबरोबरच दहीहंडी उत्सवाचेही आयोजन करण्यात येते. येत्या काही दिवसांतच हे उत्सव शहरात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी गुरुवारी रेकॉर्डवरील आरोपींची चांगलीच झाडाझडती घेतली. गुरुवारी सकाळी रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी बोलावून घेत त्यांना आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ताकीद दिली.
कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुमारे 30 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच यापूर्वी किरकोळ स्वरूपाचे मात्र वारंवार गुन्हे दाखल असलेल्या संशयीतांनाही समज देण्यात आली. उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याची ताकीद पोलिसांनी दिली.
Tags
crime news Karad