
कराड ः गोवारे ता. कराड येथील चौंडेश्वरीनगर ते गोवारे जाणाऱ्या रोडवर ट्रॅक्टर-ट्रॉलीत पोकलॅन मशिन चढवित असताना ते पलटी होवून त्याखाली सापडल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताबाबत पोकलॅन ऑपरेटर शिवप्रकाश रायसाब चौहान याने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
विधायक सिंह आत्मज बाबुराम सिंह (वय 26, मुळ रा. बभानीयावर, जैनपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. नवारस्ता, ता. पाटण) असे पोकलॅनखाली सापडून ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोवारे गावच्या हद्दीत चौंडेश्वरीनगर रस्त्यावर बांधकाम सुरू होते. या कामाच्या ठिकाणी पोकलॅन मशिन वापरण्यात आले. संबंधित मशिन गुरूवारी दुसऱ्या ठिकाणी नेले जाणार होते. मशिन वाहून नेण्यासाठी त्याठिकाणी ट्रॅक्टर-ट्रॉली बोलविण्यात आली. विधायक सिंह हा पोकलॅन मशिन चालवित ती ट्रॉलीमध्ये चढवत होता. त्यावेळी अचानक मशिन घसरून ते खाली रस्त्यावर कोसळले. तर विधायक सिंह हा त्या मशिनच्या केबिनखाली सापडून जागीच ठार झाला.
अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांसह कामगारांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोकलॅन मशिन हटवून विधायक सिंह याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.