
कराड ः कापील व गोळेश्वर येथे झालेल्या बोगस मतदानाचा मुद्दा चांगलाच गाजत असून बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी गोळेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश पवार यांनी गुरूवारपासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्ष संघटनांची पाठिंबा दिला आहे.
कापील येथे प्रियांका श्रीकांत चव्हाण, रूथ माईकल काळे, स्वाती सुनील मोरे, शितल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनीता सुरेश जाधव, स्वाती हणमंत पाटील या व्यक्ती कापील गावच्या रहिवाशी नसताना यांची नावे कापीलच्या मतदार यादीमध्ये आली आहेत. या मतदारांनी यापूर्वी ग्रामपंचायत, लोकसभा अथवा अन्य निवडणुकीमध्ये मतदान केलेले नाही. विधानसभा निवडणुकीला त्यांची नावे अचानक मतदार यादीत आली आणि त्यांनी मतदान केले. गावात त्यांचे घर, जमीन नाही. ते गावचे रहिवाशी नाहीत. अचानक हे मतदार आले कुठून, असा प्रश्न गणेश पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय कापील व गोळेश्वर या दोन्ही ठिकाणी एकाच मतदाराचे नाव आहे. गोळेश्वरमध्ये 75 मतदार संशयास्पद आहेत याची चौकशी व्हावी.
कापील मधील ग्रामपंचायतीसह अन्य निवडणुकीमध्ये तसेच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत वरील लोकांनी नावे नसताना आणि त्यांची पूर्वीच्या ठिकाणच्या मतदार यादीतून नावे वगळली गेली नसताना 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत या लोकांची नावे कशी समाविष्ट झाली या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी अमरण पवार यांनी उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान या आंदोलनास कापील ग्रामस्थांसह काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा जाहीर केला आहे.